भंडाऱ्यात सैराट.. केवळ 6 हजार रुपयांत दिली सुपारी, सासू अन् मेहुण्यानं जावयाला संपवलं, 5 अटकेत
भंडारा: पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं जीवन संपल्याची धक्कादायक घटना समोर आली असतानाच आता भंडाऱ्यातही प्रेमसंबंध आणि ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. प्रेमसंबंधातून आंतरजातीय लग्न आणि आंतरजातीय विवाहाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने ऑनर किलिंगच्या घटना आजही समाजात घडत असल्याचं दिसून येतं. काही वर्षांपूर्वी नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटात अशीच एक कथा दाखवण्यात आली होती. आता, त्याच कथेची पुनरावृत्ती भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील एका गावात घडली असून सासू अन् मेहुण्याने जावयाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे दोनच महिन्यांपूर्वी युवकाने प्रेमविवाह केला होता. आकाश शेंडे (24) असं मृत युवकाचं नावं असून पोलिसांनी (Police) याप्रकरणी 5 जणांना अटक केली आहे.
घरच्यांच्या विरोधानंतरही मुलींनं गावातीलचं तरुणाशी आंतरजातीय प्रेमविवाह केला. दोन महिन्यांपूर्वी विवाह झाल्यानंतर नवदांपत्य बेटाळा गावातचं राहत असल्यानं मुलीची आई आणि भावानं हे सहन न झाल्याने दोघांनाही ठार मारण्याची सुपारी दिली होती. केवळ 6 हजार रुपयांची सुपारी देत जावयाचीच हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर तरुणाचा मृतदेह गावालगत असलेल्या नाल्यात फेकून ती आत्महत्या असल्याचा बनाम करण्यात आला. मात्र, मोहाडी पोलिसांनी याचा शोध आणि सखोल चौकशी केली असता जावयाची आत्महत्या नसून सासू आणि मेहुण्यानं सुपारी देत ही हत्या केल्याचा कट उघडकीस आला आहे.
भंडाऱ्याच्या बेटाळा गावात ही खळबळजनक घटना काल सोमवार रोजी घडली होती. याप्रकरणी आता मोहाडी पोलिसांनी मृतकाची सासू अंजू कुंभलकर (४३) मेहुणा चेतन कुंभलकर (२३) यांच्यासह ही हत्या करण्यात सहभाग असलेल्या भारत मोहतुरे (२६), महेंद्र बोरकर (३१), दिनेश उर्फ सचिन मोहन ईश्वरकर (३७) यांना अटक केली आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत.
पुण्यात विवाहितेने जीवन संपवलं
दरम्यान, पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनिअर विवाहितेनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दीप्ती मगर चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. उरुळी कांचन पोलिसांनी याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा
गिरीश महाजनांनी केवळ दिलगिरी व्यक्त करू नये, तर…; महिला कर्मचारी माधवी जाधवांची एकच मागणी
आणखी वाचा
Comments are closed.