भंडारदरा निम्मे भरले; मुळा नदीला पूर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फाइल फोटो

अकोले तालुक्यात बुधवारी दुपारी एकनंतर पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणे व बंधाऱयांच्या पाणीसाठय़ात मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी 6 ते बुधवारी सकाळी 6 या 24 तासांत भंडारदरा धरणात तब्बल 851 दलघफूट नवीन पाण्याची आवक झाली असून, धरणाचा एकूण पाणीसाठा 5,897 दलघफूट (53.42 टक्के) झाला आहे. मुळा नदीला पूर आला आहे.

या कालावधीत रतनवाडी येथे 153 मिमी, तर घाटघर येथे सर्वाधिक 259 मिमी पावसाची नोंद झाली. आढळा खोऱयातही दमदार पाऊस झाल्याने 146 दलघफूट क्षमतेचा पाडोशी आणि 71.23 दलघफूट क्षमतेचा सांगवी हे दोन्ही लघुपाटबंधारे प्रकल्प अवघ्या दोन दिवसांत तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाले.

आढळा नदीपात्रातून देवठाण येथील 1,060 दलघफूट क्षमतेच्या आढळा धरणात मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. गेल्या 24 तासांत धरणात सुमारे 65 दलघफूट नवीन पाण्याची भर पडल्याने जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली. मुसळधार पावसामुळे आढळा नदीला पूर आला असून, समशेरपूर गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे.

नऊ पर्यटकांची सुटका

कळसूबाई शिखरावर मंगळवारी ट्रेकसाठी गेलेल्या नऊ पर्यटकांना मुसळधार पावसामुळे अचानक वाढलेल्या पाण्याचा फटका बसला. बारी–वारंगुशी मार्गावरील केटी वेअर परिसरात ते अडकून पडले होते. स्थानिक ग्रामस्थांनी दोरांच्या साहाय्याने बचावकार्य राबवून सर्व पर्यटकांची सुरक्षित सुटका केली.

मुळात 37875 क्युसेकने आवक

अहिल्यानगर जिह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरण पाणलोटातील अकोलेतील हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य भागात अतिवृष्टी होत असल्याने काल दुपारपासून अकोलेतील मुळा नदीला पूर वाढला आहे. सकाळी कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग केवळ 13836 क्युसेक होता. दुपारी 12 वाजता हा विसर्ग 29533 क्युसेक होता. त्यानंतर दुपारी 3 वाजता हा विसर्ग 37875 क्युसेकवर पोहोचला होता. मुळा नदीला पूर आल्याने मुळा धरणात विक्रमी आवक होत आहे.

Comments are closed.