भाईंदरमधील तरुणाईला ‘झॉम्बी’ची नशा; ड्रग्जचा भयंकर विळखा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बंगळुरू, चंदीगडपाठोपाठ मीरा-भाईंदर शहरातील तरुण झॉम्बी या घातक ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. हे ड्रग्ज घेतल्यानंतर तरुण मान व हात वाकवून कंबरेतून अर्धे अंग खाली टाकत एकाच ठिकाणी विचित्र अवस्थेत स्तब्ध उभे राहतात. अंगावरील कपडे काढून एकाच ठिकाणी पुतळ्यासारखे थांबतात. झॉम्बीचा भयंकर विळखा शहराभोवती घट्ट होऊ लागल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. झॉम्बी ड्रग्ज घेतलेल्या तरुणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तस्करांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

भाईंदर पश्चिमेला असलेल्या ९० फुटी रोडवर झॉम्बी ड्रग्ज सेवन केलेले तरुण दिसून आले आहेत. या तरुणांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पालकवर्गाने चिंता व्यक्त केली आहे. स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना तातडीने या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन केले आहे. ‘या ड्रग्जचा पुरवठा कुठून होत आहे, कोणत्या नेटवर्कद्वारे तो शहरात पोहोचत आहे याची सखोल चौकशी करून
संबंधितांवर कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस सतर्क झाले आहेत. संबंधित तरुण नक्की कोण आहे आणि त्याने कोणत्या अमली पदार्थांचे सेवन केले होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. अलीकडेच हैदराबाद व राजस्थान अशा विविध राज्यांत जाऊन पोलिसांनी कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. आता हे नवीन प्रकारचे सिंथेटिक ड्रग्स कुठून आले याचा तपास केला जात आहे.

झॉम्बी ड्रग्ज नेमके काय असते?
झॉम्बी ड्रग्ज म्हणून ओळखले जाणारे हे धोकादायक अमली पदार्थ व्यक्तीच्या मनावर आणि शरीरावर अत्यंत खोलवर परिणाम करतात. यांच्या सेवनामुळे शरीर बधिर होऊ शकते, ज्यामुळे ती व्यक्ती स्वतःवरील ताबा गमावून बसते आणि विचित्र, अनियंत्रित हालचाली करू लागते.

झॉम्बी ड्रग्जचा प्रकार नक्की काय आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत. यात काही नशेचा प्रकार असल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. व्हायरल झालेले व्हिडीओ नवघर किंवा भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करीत आहेत अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांनी यांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.