लखनौ सुपर जायंट्ससाठी आनंदाची बातमी, 8.60 कोटींचा मॅचविनर खेळाडू स्क्वाडमध्ये परतला
इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सच्या (LSG) संघाकडून सर्वांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, परंतु आतापर्यंत तसे काहीही पाहायला मिळालेले नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांच्या स्टार खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान, लखनौ सुपर जायंट्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिशजो सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संघासोबत नव्हता, तो आता एलएसजीच्या स्क्वाडमध्ये सामील झाला आहे.
जोश इंग्लिसला आयपीएल २०२६ च्या लिलावात लखनौ सुपर जायंट्सने ८.६० कोटी रुपयांना आपल्या संघात समाविष्ट केले होते. त्यानंतर अशी माहिती समोर आली होती की, आपल्या लग्नामुळे तो या हंगामातील सुरुवातीच्या टप्प्यातील सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. १८ एप्रिल रोजी वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील मार्गरेट रिव्हर येथे जोश इंग्लिसचा विवाह संपन्न झाला. ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या वृत्तानुसार, जोश इंग्लिस आता एलएसजीच्या संघात सामील झाला असून ४ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी तो निवडीसाठी उपलब्ध असेल. आयपीएलच्या गेल्या हंगामात जोश इंग्लिस पंजाब किंग्सच्या संघाचा भाग होता, जिथे त्याने ११ सामन्यांत ३०.८८ च्या सरासरीने आणि १६२.५७ च्या स्ट्राईक रेटने २७८ धावा केल्या होत्या.
लखनौ सुपर जायंट्ससाठी जिथे जोश इंग्लिसच्या रूपाने एक गुड न्यूज आली आहे, तिथेच दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज मॅथ्यू ब्रीत्झकेजो या हंगामात एलएसजीच्या संघाचा भाग आहे, वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला आहे. ईएसपीएनच्या रिपोर्टनुसार, ब्रीत्झकेच्या घरी परतण्याचे मुख्य कारण त्याच्या पत्नीच्या कुटुंबातील एका जवळच्या सदस्याचे निधन झाले हे आहे. ब्रीत्झके या हंगामातील उर्वरित सामन्यांसाठी परतणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लखनौने या आयपीएल हंगामात आतापर्यंत ८ सामने खेळले असून त्यापैकी केवळ २ सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला आहे.
Comments are closed.