श्रीलंकेच्या खेळाडूंनी महिला डॉक्टरचा आंघोळ करताना व्हिडीओ काढला, दोघांना अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

श्रीलंकेच्या दोन खेळाडूंना एका महिला डॉक्टरचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलं आहे. नाराहेनपिटा परिसरातील एका हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. व्यावसायिक परिषदेसाठी अनेक महिला डॉक्टर या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. आरोपी खेळाडूंनी बाथरूममधील छोट्या छिद्रांचा आणि मोकळ्या जागेचा फायदा घेत मोबाईलच्या साहाय्याने हा प्रकार केला, ज्यानंतर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही खेळाडू श्रीलंकेच्या 19 वर्षांखालील संघामध्ये खेळतात. या घटनेनंतर या दोन्ही खेळाडूंना मॅजिस्ट्रेट न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्यांना 5 लाख श्रीलंकाई रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 मे रोजी होणार आहे. हे व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आले आहेत किंवा नाही, तसेच या खेळाडूंनी हॉटेलमधील काही पुरुषांचेही व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत का, या दिशेने पोलीस सध्या कसून तपास करत आहेत.

श्रीलंका क्रिकेट बोर्ड आधीच विविध कारणांमुळे वादात सापडले असून, नुकतेच माजी अध्यक्ष शम्मी सिल्वा यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. सध्या बोर्डाचा कारभार केंद्र सरकारने आपल्या हाती घेतला असून, माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा यांचा समावेश असलेली 9 सदस्यीय ट्रान्सफॉर्मेशन समिती स्थापन करण्यात आली आहे. याआधीही दनुष्का गुणातिलकाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली होती आणि तिलकरत्ने दिलशानही लैंगिक छळाच्या प्रकरणात अडकला होते, ज्यामुळे श्रीलंका क्रिकेटचा वादग्रस्त इतिहास पुन्हा एकदा समोर आला आहे.

Comments are closed.