भाजपचे लक्ष जनरल झेडवर

नितीन नबीन यांच्यासह विनोद तावडे, स्मृती इराणींवर मोठी जबाबदारी : नव्या टीमच्या पदाधिकाऱ्यांची दिल्लीत बैठक

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखालील नव्या 65 सदस्यीय राष्ट्रीय टीमची पहिली बैठक शनिवारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पार पडली. या बैठकीत भाजपने ‘जेन-झी’ म्हणजेच तरुण मतदारांशी संपर्क साधण्यासाठी एक विशेष टीम तयार केली. यामध्ये भाजप अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी आणि विनोद तावडे यांच्यासह गुजरातचे मंत्री हर्ष संघवी आणि छत्तीसगडचे मंत्री ओ. पी. चौधरी यांचा समावेश आहे. या सदस्यांच्या माध्यमातून पक्ष तरुणांशी थेट संवाद साधून त्यांचे विचार, समस्या आणि अपेक्षा समजून घेतल्या जातील. तसेच महत्त्वाचे म्हणजे या बैठकीत भाजपने ‘वंदे मातरम्’बाबतच्या काँग्रेसच्या निर्णयाला विरोध करणारा ठराव मंजूर केला. कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताचे केवळ दोन परिच्छेद गाण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचा भाजपने निषेध केला आहे.

देशभरातील तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाने 22 ऑगस्ट 2026 रोजी एका विशेष ‘जेन-झी’ (जनरेशन-झेड) कार्यक्रमाची घोषणा केली. या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वात एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे. पक्षसंघटनेत झालेल्या बदलानंतर झालेल्या या पहिल्याच बैठकीत नितीन नबीन यांनी उपस्थितांना काही महत्त्वाचे संदेश दिले. तसेच या नव्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत पंतप्रधान मोदी यांनी मौलिक मार्गदर्शन केले. या नव्या टीमची घोषणा 17 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती.

भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवीन संघ बैठकीत आगामी निवडणुका, संघटना मजबूत करणे आणि पक्षाच्या कार्यक्रमांवर चर्चा झाली. तसेच भाजप देशभरात वंदे मातरम्चा इतिहास आणि महत्त्व पसरवण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. भाजप वंदे मातरम्चा सन्मान, प्रतिष्ठा आणि वारसा जपेल, असे नितीन नबीन यांनी जाहीर केले. यासंबंधी विशेषत: तरुणांमध्ये जनजागृती मोहीम राबवून नवीन पिढीला संपूर्ण वंदे मातरम् आणि त्याच्याशी संबंधित इतिहास समजवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

‘वंदे मातरम्’संबंधी काँग्रेसच्या निर्णयाविरोधात ठराव मंजूर

काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची फक्त पहिली दोन कडवी गाण्याच्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीतील निर्णयाचा निषेध करणारा ठराव भाजपने शनिवारी मंजूर केला. सहा कडव्यांचे ‘वंदे मातरम्’ हे संपूर्ण राष्ट्रगीत भारताची राष्ट्रीय चेतना आणि स्वातंत्र्य लढ्याचा वारसा दर्शवते, असे भाजपने म्हटले आहे. या बैठकीत वंदे मातरम्चा सन्मान जपण्याचा आणि जातीय दबाव, राजकीय लांगुलचालन किंवा व्होट-बँक राजकारणाचा बळी बनवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना विरोध करण्याचा भाजपने निर्धार केला आहे. वंदे मातरम् हा केवळ कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित विषय नाही. हा भारताच्या सन्मानाचा आणि राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या असंख्य देशभक्तांच्या वारशाचा प्रश्न आहे, असे नितीन नबीन म्हणाले. ‘वंदे मातरम्’ ही 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 2047 मध्ये ‘विकसित भारता’ची घोषणा देखील ‘वंदे मातरम्’ ही असेल, असेही ते पुढे म्हणाले.

तरुणाईवर नजर…

► भाजपची नवी टीम ‘जेन-झी’मध्ये ‘युवा संवाद’ मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेत 14 ते 25 वयोगटातील तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

► तरुण मतदारांपर्यंत पक्षाची पोहोच आणि त्यांच्याशी असलेले संबंध अधिक दृढ करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रम, चर्चा आणि युवा संवादांचा समावेश आहे.

► विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘जेन-झी’चे विचार, समस्या, गरजा आणि अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तरुणांना थेट संवादाद्वारे आपले प्रश्न मांडण्याची संधीही दिली जाईल.

Comments are closed.