भाजप नेत्याचं निधन, मनसेच्या बाळा नांदगावकरांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट, म्हणाले, ‘माझा हक्काच

भाजप नेते राज के पुरोहित यांचे निधन मुंबई भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि उत्तर भारतीयांचे प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते राज के. पुरोहित यांचे आज दुःखद निधन (Raj K purohit passes away) झाले. वयाच्या 71 व्या वर्षी मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने केवळ भाजपच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

राज पुरोहित हे एकेकाळी मुंबई भाजपमधील अत्यंत सामर्थ्यशाली नेते मानले जात होते. दक्षिण मुंबईत त्यांचा मोठा जनाधार होता. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांचे पुत्र आकाश पुरोहित वॉर्ड क्रमांक 221 मधून विजयी झाले होते. मात्र, मुलाच्या विजयाचा आनंद अनुभवण्याआधीच राज पुरोहित यांचे निधन झाले.

Bala Nandgaonkar: बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी फेसबुक पोस्ट करत राज पुरोहित यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. “अजून एक तारा निखळला,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, अजून एक तारा निखळला. आज माझे अत्यंत जवळचे मित्र राज पुरोहित यांचे निधन झाले. राज पुरोहित आणि माझा राजकीय प्रवास एकत्रच सुरू झाला. त्यांनी नगरसेवक म्हणून सुरुवात केली त्याचवेळेस मी सुद्धा नगरसेवक होतो. मग आमदार म्हणून आम्ही जवळपास 20 वर्षे एकत्र सदनात होतो. ते गृहनिर्माण खात्याचे आणि मी गृह खात्याचा मंत्री म्हणूनही एकत्र काम केले.

Bala Nandgaonkar on Raj K purohit passes away: ‘माझा हक्काचा मित्र आज निघून गेला’

विधानसभेत आमचा एक मित्रांचा ग्रुप होता ज्यामध्ये आर आर पाटील, मी, राजपुरोहित, गिरीश बापट प्रकाश मेहता, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील,  असे अनेक मित्र होते. भाडेकरूंसाठी दीर्घकालीन लढा देणारे राज पुरोहित हे कायम भाडेकरूंच्या हक्कासाठी लढत राहिले. भाषेत आक्रमकता, प्रखर वकृत्व अभ्यासू स्वभाव यामुळे राजपुरोहित यांनी ठसा उमटवला. जेव्हा भाजप सत्तेच्या जवळपास ही नव्हती तेव्हापासून, कायम ते त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले. आज त्यांच्या जाण्याने जुने दिवस डोळ्यासमोर आले आणि आर आर आबा , गिरीश बापट यांच्या नंतरचा माझा हक्काचा मित्र आज निघून गेला. लोकांच्यासाठी लढा देणारा, एकनिष्ठ असणारा, असे व्यक्ती राजकारणात अभावानेच दिसून येतात. राज पुरोहित यांना भावपूर्ण श्रद्धांजली, ओम शांती, असे त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?

आणखी वाचा

Comments are closed.