एक्झिट पोलमध्ये भाजप-आरएलओएची आघाडी
पश्चिम बंगाल, आसाम, पुदुच्चेरी येथे विजय शक्य, केरळमध्ये काँग्रेस आघाडी तर तामिळनाडूत द्रमुकच्या विजयाचा अंदाज
सर्वेक्षणांचे निष्कर्ष काय सांगतात…
- आसाममध्ये भाजप-रालोआ तर केरळमध्ये काँग्रेस आघाडी यावर एकमत
- बव्हंशी सर्वेक्षण संस्थांच्या अनुमानांच्या अनुसार तामिळनाडूत पुन्हा द्रमुक
- एका संस्थेचा अपवाद वगळता पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता निश्चित
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश यांच्यातील विधानसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पश्चिम बंगाल राज्यातील द्वितीय आणि अंतिम टप्प्याचे मतदान पूर्ण होताच विविध सर्वेक्षण संस्थांनी त्यांचे मतदानोत्तर सर्वेक्षणाचे (एक्झिट पोल) निष्कर्ष घोषित केले आहेत. त्यांचा सर्वंकष विचार करता आसाम, पश्चिम बंगाल ही दोन राज्ये तसेच पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश या तीन स्थानी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांची सरशी होईल, अशी शक्यता आहे. केरळ काँग्रेस आघाडीकडे जाईल, तर तामिळनाडू द्रमुककडेच राहील, असे भाकित आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून मतदानोत्तर सर्वेक्षणांची अनुमाने प्रसिद्ध होण्यास प्रारंभ झाला. ही सर्वेक्षणे करणाऱ्या सर्व संस्थानी आसाममध्ये पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष यांनाच मोठे बहुमत मिळेल, असा निष्कर्ष प्रसिद्ध केला आहे. तो खरा ठरल्यास भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष हे या राज्यात विजयाची हॅटट्रिक साध्य करू शकतात. पश्चिम बंगालमध्ये एका संस्थेचा अपवाद वगळता इतर सर्व संस्थांच्या सर्वेक्षणामध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तामिळनाडूतही एका संस्थेचा अपवाद वगळता इतर संस्थानी अण्णा द्रमुकच्या नेतृत्वातील रालोआ विजयी होईल, असे अनुमान काढण्यात आले असून द्रमुक पक्षाला सत्ता सोडावी लागेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. केरळसंबंधी मात्र, सर्व सर्वेक्षणांमध्ये काँग्रेस आघाडीचीच सरशी होईल, असे भाकित वर्तविण्यात आले आहे. पुदुच्चेरीचे सर्वेक्षण एकाच संस्थेने केले असून तेथे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सलग दुसऱ्यांना सत्तेवर येईल, असा निष्कर्ष काढलेला दिसून येत आहे.
सर्वात आकर्षक पश्चिम बंगाल आहे
विधानसभा निवडणुकांच्या या फेरीत सर्वाधिक चर्चेत पश्चिम बंगालची निवडणूक राहिलेली आहे. पश्चिम बंगालसंबंधी अनेक सर्वेक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. तेथे यंदा ‘सत्ता परिवर्तन’ होणार असा निष्कर्ष बहुतेक सर्व सर्वेक्षण संस्थांनी काढल्याचे दिसून येते. तेथे सलग पंधरा वर्षे तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे.
तामिळनाडूत उत्कंठावर्धक स्थिती
दोन अपवाद वगळता तामिळनाडूत सध्याचे द्रमुक सरकार पुन्हा सत्तेवर येईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एका सर्वेक्षण संस्थेने मात्र अभिनेता विजय याचा टीव्हीके हा पक्ष सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून समोर येईल आणि विधानसभा त्रिशंकू असेल, असे भाकित केले आहे. त्यामुळे उत्कंठा वाढली आहे. चार संस्थांनी द्रमुक आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा निष्कर्ष काढला असून दोन संस्थांनी या राज्यातील सत्तांतर होऊन अण्णाद्रमुकच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर येईल, असा निष्कर्ष काढल्याचे दिसत आहे. त्यामुळे 4 मे या दिवशी नेमके काय होणार, याची चर्चेला आतापासूनच प्रारंभ झाला असून राजकीय नेते पुढील धोरणांचे निर्धारण करण्यात गुंतल्याचे वृत्त आहे.
येत्या सोमवारी मतगणना
मतदानोत्तर सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांनी त्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध केले असले, तरी प्रत्यक्ष परिणाम येत्या सोमवारी, अर्थात 4 मे या दिवशीच समजणार आहेत. मतदानोत्तर सर्वेक्षणांचे निष्कर्ष काहीवेळा अचूक तर काहीवेळा चूक ठरु शकतात. त्यामुळे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. परिणामी, आता सर्वांना येत्या सोमवारची प्रतीक्षा आहे. विधानसभा निवडणुकांची ही फेरी उत्कंठावर्धक परिणाम देणारी ठरेल, अशी शक्यता अनेक निवडणूक तज्ञांनी व्यक्त केली आहे.
प. बंगालमध्ये द्वितीय टप्प्यातही विक्रमी मतदान
पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या द्वितीय टप्प्यातील 142 मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रथम टप्प्याप्रमाणे या टप्प्यातही 91.49 टक्के इतके घसघशीत मतदान झाले आहे. ही आकडेवारी बुधवारी संध्याकाळी 6 वाजताची आहे. अंतिम टक्केवारी प्रथम टप्प्याप्रमाणेच 93 टक्क्यांपेक्षा अधिक होऊ शकते. हा भारतातील आतापर्यंतच्या कोणत्याही राज्याचा विक्रम आहे. यापूर्वीचा विक्रम त्रिपुरा या राज्याचा होता. त्या राज्यात 2013 मध्ये 91.82 टक्के मतदान झाले होते. पण पश्चिम बंगालच्या मतदानाची अंतिम टक्केवारी प्रसिद्ध झाल्यानंतर त्रिपुरातील विक्रम मागे पडणार, हे आता निश्चित मानले जात आहे.
Comments are closed.