सोलापूरसह सातारा सांगली आणि धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपचाच अध्यक्ष होणार, मंत्री गोरेंचा दावा
जयकुमार गोरे : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निकालानंतर आता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या पक्षांकडे जाणार याची चर्चा सुरु आहे. अद्याप अध्यक्षपदाची निवड झालेली नाही. अशातच मंत्री जयकुमार गोरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सोलापूरसह, सातारा, सांगली आणि धाराशिव या चारही ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचे होणार असल्याचा दावा मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. साताऱ्यातील घडामोडींवर बारकाईने लक्ष असल्याचे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
आता निवडणुका संपल्या असल्याने पुन्हा एकत्र यायला काहीच अडचण नाही
सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपने विक्रमी बहुमत मिळवल्याने येथील अध्यक्ष भाजपाचाच होणार असल्याचे गोरे म्हणाले. मात्र सातारा सांगली आणि धाराशिव या तीनही जिल्ह्यात अंतिम क्षणी जिल्हा परिषद अध्यक्ष हा भाजपचा झालेला दिसेल असा मोठा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माझाशी बोलताना केला. सातारा जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष असून सत्तेसाठी पाच ते सहा जागा कमी पडत आहेत. सातारा जिल्ह्यात आम्ही थोडे कमी पडलो हे आम्हाला मान्य आहे, पण इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने जागा आम्ही जिंकून दाखवल्या आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुती म्हणून जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी तयारीत आहेत. त्यामुळं जरी निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो असलो तरी आता निवडणुका संपल्या असल्याने पुन्हा एकत्र यायला काहीच अडचण नाही असे गोरे यांनी सांगितले आहे.
साताऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपाचा
सातारा येथे सत्ता स्थापनेसाठी घडणाऱ्या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री स्वतः बारकाईने लक्ष ठेवून आहेत. साताऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपाचा असेल असा दावा त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे धाराशिव मध्ये तर महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो होतो. अशावेळी मित्र पक्षातील काही कुरबुरी असतील तर त्या बैठकीत सोडविल्या जातील मात्र निवडीच्या अंतिम क्षणी सातारा सांगली आणि धाराशिव या ठिकाणीही भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष झालेला दिसेल असा दावा गोरे यांनी केला आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील पक्षात एकमत होईल असे चित्र नसून भाजप आणि मुख्यमंत्री ठरवतील तीच जागा विजयी होईल असा मोठा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केल्याने या निवडणुकीत अनेक घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी मधील अनेक नेते आणि आमदारांना भाजपसोबत काम करायची इच्छा आहे असे संकेत देत राज्यसभा आणि विधानपरिषद जागांबाबत या तीनही पक्षात एकमत होईल असे आपल्याला वाटत नसल्याचेही गोरे यांनी सांगितले. त्यामुळे भाजप आणि मुख्यमंत्री जे ठरवतील तीच जागा राज्यसभेला विजयी होईल असा दावा त्यांनी केला आहे. विधान परिषदेत तर विरोधकांना एकही जागा मिळण्याची शक्यता नसून तेथील जागा ही भाजप जिंकेल असा दावा केल्याने या निवडणुकीतही पुन्हा क्रॉस वोटिंग होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.