आयपीएलमध्ये ब्लॅक मॅजिक? ललित मोदींचा खळबळजनक दावा; म्हणाले, “2011 मध्ये एका संघमालकानेही….”
आयपीएल २०२६ मध्ये शनिवारी (१८ एप्रिल) सनरायझर्स हैद्राबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यावेळी झालेल्या काळ्या जादूचा वाद सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सामन्यादरम्यान हैद्राबादचा एक चाहता लिंबूचा विधी (या क्रियेला अनेकदा काळी जादू म्हणतात) करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.
या व्हिडिओमध्ये तो चाहता लिंबूचा विधी केल्यानंतर तो लिंबू मैदानाच्या दिशेने केला. त्यावेळी चेन्नईचा अष्टपैलू शिवम दुबे फलंदाजी करत होता. त्या चाहत्याने लिंबू त्याच्याकडे फिरवला आणि पुढच्याच क्षणी शिवम बाद झाला. या प्रकाराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर चेन्नईने आयपीएलकडे तक्रार केल्याचेही एक पत्र व्हायरल झाले आहे. या सर्व प्रकारांवर माजी आयपीएल आयुक्त ललित मोदी यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.
मोदी यांनी भूतकाळातही अशा गोष्टी घडल्या आहेत, असेही वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, “मला आठवतंय, एका संघमालकाने विरोधी संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये केलेले अशाप्रकारचे कृत्य मी पोस्ट केले होते. २०११ च्या हंगामात असे घडले, तेव्हाच मी विरोधी संघाच्या मालकांना याबद्दल सावध केले होते आणि मला ठोस पुराव्यासह सूचना मिळाली होती. कोणी आणि कशाप्रकारे ही कृत्ये केली हे मी लवकरच उघड करेन.”
मोदी यांनी एक्सच्या त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून ही माहिती दिली असून त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये सीएसकेच्या पत्राच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, “हे आता बनावट वाटत आहे, मात्र एका संघाचा मालक अशा प्रकारच्या प्रथेमध्ये सामील होता.”
हैद्राबादने चेन्नईला १९५ धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना १७ व्या षटकावेळी शिवम खेळपट्टीवर होता. तेव्हा चेन्नईची स्थिती १५४ धावांवर ७ विकेट्स अशी होती. यावेळी शिवम सामन्याचे चित्र पालटणार की काय असे वाटत होते. तसेच हैद्राबाद त्याची विकेट घेण्याच्या प्रतिक्षेत होते. त्या व्हायरल व्हिडिओमध्ये स्टॅंडमध्ये असणाऱ्या चाहत्याने लिंबू उचलून तो काहीतरी पुटपुटला आणि शिवमकडे वळवला. काही क्षणानंतरच तो त्रिफळाचीत झाला आणि स्टेडियममध्ये त्याची विकेट पडताच जल्लोष झाला.
साकिब हुसैनने टाकलेल्या त्या चेंडूवर शिवम १६ चेंडूत २१ धावा करत बाद झाला. यामध्ये त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. हा सामना चेन्नईने अवघ्या १० धावांनी गमावला.
Comments are closed.