BLOG : निषेधाची अगरबत्ती..


ब्लॉग: बुवा बाबा बलात्कार करतो, तेव्हा समाजातला एक घटक लगेच त्याची बाजू घेऊन पोकळ युक्तिवाद करतो. म्हणजेच धार्मिक शेड्स असणाऱ्या कोणत्याही धर्माच्या नीच इसमाच्या मागे त्या समाजातला एक तरी हिस्सा कधी उघड तर कधी छुप्या पद्धतीने उभा असतो.

बलात्काराचा गुन्हा शाबित होऊन सजा भोगून बाहेर आलेल्या अधम पुरूषांचा सत्कार एका विशिष्ट विचारसरणीचे, पक्षाचे लोक करताना दिसतात. विशेष म्हणजे यांचा निषेध त्या विचारांच्या, त्या पक्षाच्या एकाही माणसाला यावर ब्र शब्द उच्चारावा असे वाटत नाही. ही नैतिकता हेच त्यांचे खरे चरित्र असते!

आमदारासारखे लोकप्रतिनिधी सामान्य माणसाला धमकावतात की तुझ्या आईला झ*, तुझ्या बहिणीला *वतो, बायकोचा फो* फाडतो.. तेव्हा पोलिस सांगतात की हा अदखलपात्र गुन्हा आहे. म्हणजेच सार्वजनिक रित्या बलात्कार करण्याची धमकी देणं गंभीर नाही, त्याने कुणाची आयमाय एक केली तरच कायद्याचे स्तंभन होणार! एरव्ही आरोपी गबरगंड असला की पोलिसांचे वीर्यपतन ठरलेलं असतं.

ज्या जातीचा माणूस बलात्कारी असतो त्या जातीतले लोक लगेच त्याच्या बचावात उतरलेले असतात. अर्थात याला काही अपवाद आहेत.

अपराधी गुन्हेगार आपल्या आवडत्या पक्षाचा असेल तर त्या पक्षाचे समर्थक खुलेआमपणे त्याची बाजू घेताना दिसतात.

अपराधी इसमाविषयीचा समाजाचा तत्कालिक राग कमी होताच न्यायव्यवस्थेतले दलाल आधी साक्षीदार फोडतात, पुराव्यांशी छेडछाड करतात नि सरतेशेवटी पीडितेच्या कुटुंबियांना धमकावणे सुरू होते. त्यांना आमिष दाखवलं जातं. ठार मारण्याची भीती घातली जाते.

यावेळी त्यांच्या मागे सोशल मीडिया नसतो, पब्लिक नसतं, नातलग समाज कुणीही त्यांच्या मागे नसतं. मग ते हतबल होत जातात. त्यांचं खटल्याच्या सुनवणीस येणं रोडावत जातं. केस कमजोर होते. आरोपी निर्दोष सुटतो. बाहेर पडल्यावर त्याचं नरपुंगवांचं धाडस आणि सामाजिक वजन दोन्हीही वाढलेलं असतं.

एरव्ही रोज किमान शंभरेक बलात्कार घडत असतात तेव्हा समाज नावाचा सुस्त अजगर गप पडून असतो. ते बलात्कार दखलपात्र नसतात का? ज्या घटनेत काही तरी भयंकर, अमानुष, टोकाची विकृती दिसते त्या बाबतीत किंवा जातीधर्माचा टोकदार ॲंगल असेल तरच त्या प्रकरणाची हाईप तयार होते. कथित जनक्षोभ काही दिवसांसाठी उफाळून येतो. पुन्हा थंड पडतो. असेच एखादे अमानवी कृत्य उघडकीस येईपर्यंत हा पादरा जनक्षोभ गवताचे भारे बांधत पडून असतो.

आपल्या नावडत्या पक्षाचे राज्य जिथे सत्तेत आहे तिथे घडणाऱ्या बलात्कारादि घटनांविषयी आकांडतांडव करणारे लोक आवडत्या पक्षाच्या राजवटीत कसलाही गुन्हा घडला तरी तोंड उघडत नसतात! हे आता अंगवळणी पडलंय!

फक्त बोलण्यापुरता संताप व्यक्त करून स्त्रियांच्या चरित्राविषयी आपल्या अंतःकरणात खूप कणव आहे असे दाखवणारे अनेक जण अवघ्या काही तासांतच मूळ रंग दाखवत सोशल मीडियावर आईबहिण एक करताना दिसतात. वाट्टेल तशी शिवीगाळ करून स्त्रियांचे एक प्रकारे डिजिटल रेप करतात! हे सहज खपून जातं, आणि यात स्त्रियाही सामील असतात!

इतकं सारं असूनही अलीकडील काळात बलात्कारासाठी स्त्रियांना दोषी धरण्याचे खूळ हेतूत: रूजवले जातेय. बायका कशा बदचलन होत चालल्यात याचा सतत भडीमार सुरू असतो. बायकांनी काय बोलावं, काय काम करावं, कसं राहावं, कोणते कपडे घालावेत अशा एक ना शंभर सूचनावजा आदेशांची भरमार असते! बंडूपासून ते *डूपर्यंतचे टगे मात्र मोकाट सोडलेले असतात.

बलात्काराच्या गुन्ह्यांत दोषी सिद्ध होऊन सजा लागण्याचे प्रमाण अल्प आहे. केसची सुनावणी काही दशके चालते. आरोपी ऐश करत राहतो, पीडितेला मात्र लोकांच्या हावरट नजरांचा रोज सामना करावा लागतो.

आयटीसेल सारखी विकृत पैदास पोसली जाते जी विरोधात व्यक्त होणाऱ्या स्त्रियांना बीभत्स, किळसवाण्या, गलिच्छ शिव्यांची लाखोली वाहत असते.

बेसिकली आपण दांभिक झालो आहोत. बाई ही एक भोगवस्तू आहे हे आपल्याकडे अतिशय चतुराईने लोकमानसात बिंबवले गेलेय, आता त्यास विलक्षण बळकटी मिळतेय.

वरवर हे सर्व भिन्न आणि लहानमोठे मुद्दे वाटतात मात्र याचा परस्परसंबंध आहे! या सर्व गोष्टींनी विकृत पुरूषांचे मनोबल वाढत असते. आपल्याला काही फरक पडत नसतो.

थोडक्यात सांगायचे झाले तर बलात्कार ही अतिशय विकृत गंभीर आणि दुःखद गोष्ट आपण न्यू नॅार्मलवर आणून ठेवलीय. आणि त्याची फळे सत्तरीच्या वृद्धेपासून ते सात महिन्याच्या कोवळ्या बालिकेलाही भोगावे लागतायत!

पण आपल्याला काय त्याचं, आपली निषेधाची अगरबत्ती तर कालच लावून झालीय! आपलं महान कर्तव्य आपण चोख पार पाडलंय!

– समीर गायकवाड

Comments are closed.