एकाच घरात पाच लग्नाच्या मिरवणुका…
आपला देश सांस्कृतिक विविधतेने नटला आहे. प्रत्येक समाजाच्या काही विशिष्ट प्रथा आणि परंपरा असतात. तो समाज या प्रथा शक्य तितक्या नेटाने आणि प्रदीर्घकाळ चालवत असतो. उत्तराखंड या राज्यात असणाऱ्या ‘जौनसारी’ समाजात परंपरा अशी आहे, की येथे विवाहघरात वधू वरात घेऊन येते आणि वराच्या घरी लग्न लावले जाते. खरासी गावात या समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती दौलतसिंग चौहान यांच्या घरी त्यांच्या पाच पुत्रांचा विवाह एकचवेळी करण्यात आला. त्यामुळे पाच वधू या घरात वरातीसह पोहचल्या. ही घटना गावकऱ्यांसाठीही अनोखी होती. त्यामुळे हे विवाह पाहण्यासाठीही गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली.
प्रत्येक वधूसह 10 ते 13 वऱ्हाडी मंडळी होती. एकाच स्थळी या पाचही विवाहांचे धार्मिक रितीरिवाज पार पडले. अशा प्रकारे एकाच घरात पाच विवाह एकाच मुहूर्तावर पार पडण्याची ही गावातील प्रथमच वेळ आहे, असे अनेक गावकऱ्यांचे म्हणणे आहे. हे पाच विवाह झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या पाच भावांच्या एकुलत्या एका बहिणीचा विवाहही करण्यात आला. अशा प्रकारे एकाच वेळी विवाह केल्याने मोठ्या प्रमाणात खर्च वाचला असून वेळ आणि श्रम यांचीही बचत झाली आहे, असे मत चौहान कुटुंबियांनी व्यक्त केले. सध्या हा विवाह सोहळा पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला असून हे वृत्त सोशल मिडियावरही प्रसारित झाले आहे. अलिकडच्या काळात एकाच घरात पाच सख्खे बंधू असणे हे खेडोपाडीही दुर्मिळ झाले आहे. शहरात तर अशा प्रकारची एकत्र कुटुंबे पहावयास मिळतही नाहीत. त्यामुळे या विवाहाची विशेष चर्चा होत आहे. अशा प्रकारे दौलतसिंग चौहान यांच्या घराण्याची एकाचवेळी पाच भिन्न भिन्न घराण्यांशी सोयरीत जुळली आहे. याचा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अभिमान आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या विवाहांमुळे समाजाची प्रदीर्घ काळपासून चालत आलेली परंपरा तर पाळली गेली आहेच. तसेच पैशाचा अपव्यय टाळून हे विवाह करण्यात आल्याने समाजाला एक आधुनिक संदेशही मिळाला आहे. त्यामुळे एकाच वेळी परंपरा आणि आधुनिक विचार यांचा संगम या विवाहाच्या निमित्ताने पहावयास मिळाला, अशी प्रतिक्रिया या विवाहाला उपस्थित असणाऱ्यांची आहे.
Comments are closed.