भांडूपमधील 3 वॉर्डमुळे ठाकरे गट-मनसेचं जागावाटप अडलं, राज ठाकरेंनी अनिषा माजगावकारांना शिवतीर्थ
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जागावाटप: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही तासांमध्ये भाजप-शिंदे गट आणि ठाकरे बंधूंच्या मनसे-ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Camp) युतीकडून जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दोन्ही पक्षांचे मुंबईतील बहुतांश जागावाटप निश्चित झाले असले तरी काही जागांवरचा दावा दोन्ही पक्ष सोडायला तयार नाहीत. यामध्ये मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात (Bhandup News) असणाऱ्या वॉर्ड क्रमांक 114 चा समावेश आहे. ठाकरे गट आणि मनसे (MNS) दोन्ही पक्षाचे नेते वॉर्ड क्रमांक 114 कोणत्याही परिस्थितीत सोडायला तयार नाहीत. त्यामुळे आता हा तिढा सोडवण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भांडूपमधील मनसेच्या नेत्या अनिषा माजगावकर यांना शिवतीर्थवर बोलावून घेतले आहे. आता शिवतीर्थवर राज ठाकरे त्यांच्याशी काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
ठाकरे गटाचे माजी आमदार रमेश कोरगावर हे भांडूपच्या वॉर्ड क्रमांक 114 मधून आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी येथून आग्रही आहेत. तर मनसेच्या माजी नगरसेविका अनिषा माजगावकर यांनीही या जागेवर शड्डू ठोकला होता. अनिषा माजगावकर 2012 मध्ये इथून नगरसेविका झाल्या होत्या, तर 2017 मध्ये रमेश कोरगावकर यांनी अनिषा माजगावकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 114 कोणाला सुटणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आता राज ठाकरे शिवतीर्थवर अनिषा माजगावकर यांची समजूत घालणार की त्यांना या जागेवरुन लढण्यासाठी एबी फॉर्म देणार, हे पाहावे लागेल. भांडूप परिसरात कोकणातील लोक मोठ्याप्रमाणावर वास्तव्याला आहेत. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यापासूनच भांडूपमध्ये त्यांच्या पक्षाला मोठा जनाधार असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेची वाताहात झाली असतानाही भांडूपमध्ये राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, ही जागा ठाकरे गटाच्या रमेश कोरगावकर यांच्या पत्नीला दिल्यास याठिकाणचे मनसैनिक नाराज होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि अनिषा माजगावकर यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मनसेकडून वॉर्ड क्रमांक 110, वॉर्ड क्रमांक 114 आणि 115 ची मागणी करण्यात आली आहे. यापैकी किती वॉर्ड मनसेला मिळणार, हेदेखील बघावे लागेल.
दरम्यान, मंगळवारी सकाळी मनसेच्या प्रमुख नेत्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी जागावाटपाबाबतच्या वाटाघाटींविषयी त्यांना माहिती देण्यात आली. यानंतर मनसेच्या पक्ष कार्यालयात स्वतंत्र बैठक सुरु आहे. या बैठकीला नितीन सरदेसाई, अनिषा माजगावकर, संदीप देशपांडे, योगेश सावंत, यशवंत किल्लेदार, कुणाल माईनकर उपस्थित राहणार आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.