मुलुंडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद, नील सोमय्यांचा विजय निश्चित, पण ठाकरे बंधू वेग
बीएमसी निवडणूक नील सोमय्या: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि देशाच्या आर्थिक नाड्या हातात असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे (BMC Election) बिगुल वाजले असून, अवघ्या काही दिवसांत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुलुंडमधील प्रभाग क्रमांक 107 मधून एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. ठाकरे बंधू आणि शरद पवार गटाच्या युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भाजप उमेदवार नील सोमय्या (Neil Somaiya) यांचा विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे चित्र आहे.
भाजपचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे पुत्र नील सोमय्या हे मुलुंडच्या प्रभाग क्रमांक 107 मधून निवडणूक लढवत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार भरत (हंसराज) दणाणी यांचा उमेदवारी अर्ज आवश्यक प्रतिज्ञापत्र न जोडल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीतच बाद केला. त्यामुळे या प्रभागातील प्रमुख विरोधी उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर पडल्याने नील सोमय्यांसमोरील थेट आव्हान संपुष्टात आले आहे. विशेष म्हणजे, ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे यांनी या वॉर्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जागा सोडली होती. मात्र, युतीतील उमेदवाराचाच अर्ज बाद झाल्याने ठाकरे–पवार आघाडीचा या प्रभागातील डाव फसल्याचे मानले जात आहे.
BMC Election Neil Somaiya: नील सोमय्यांचा विजय निश्चित
या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत, “प्रभाग क्रमांक 107 मध्ये ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आणि शरद पवार गटाचा एकही उमेदवार आता रिंगणात नाही. देवाची लीला अपरंपार आहे,” असे सूचक वक्तव्य केले. नील सोमय्या हे 2017 साली याच प्रभागातून प्रथमच निवडून आले होते आणि यंदा ते दुसऱ्यांदा महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत. मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गुजराती आणि मारवाडी समाजाची मोठी लोकसंख्या, तसेच मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकांतील भाजपची मजबूत कामगिरी लक्षात घेता, या वॉर्डमध्ये नील सोमय्या यांचे पारडे आधीपासूनच जड मानले जात होते. आता प्रमुख विरोधी उमेदवारच बाहेर पडल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचे चित्र आहे.
BMC Election Neil Somaiya: ठाकरे बंधूंचा ‘प्लॅन बी’?
मात्र, या प्रभागातील लढत पूर्णपणे एकतर्फी ठरेल, असेही नाही. कारण वॉर्ड क्रमांक 107 मध्ये सध्या 9 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली सकपाळ यांचाही समावेश आहे. ठाकरे बंधू–शरद पवार आघाडीचा अधिकृत उमेदवार आता नसल्याने, ठाकरे बंधू अपक्षांपैकी एखाद्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जर ठाकरे बंधूंनी एखाद्या अपक्ष उमेदवाराला उघड पाठिंबा दिला, तर ही लढत रंगतदार होऊ शकते. अन्यथा, नील सोमय्या यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
BMC Election Neil Somaiya: ठाकरे बंधू अपक्ष उमेदवाराला पाठींबा देणार का?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. 15 जानेवारी 2026 ला मतदान आणि 16 जानेवारी 2026 ला निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र, मुलुंडच्या प्रभाग क्रमांक 107 मध्ये नील सोमय्यांचा विजय निश्चित मानला जात असतानाच, ठाकरे बंधू शेवटच्या टप्प्यात अपक्षांमधून एखादा धक्का देतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.