उड्डाणानंतर विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये बिघाड; केबिनचे छत कोसळल्याने प्रवाशांचा थरकाप उडाला, पहा Video
इराणच्या सेपेहरान एअरलाइन्सच्या एका विमानाचा भीषण अपघात टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मशहद येथून केरमानशाहकडे जाणाऱ्या बोइंग 737 या विमानाच्या उड्डाणादरम्यान अचानक टायर फुटला. टायरचे तुकडे इंजिनमध्ये घुसल्यामुळे इंजिनचे मोठे नुकसान झाले आणि विमानाला अचानक तीव्र हादरे बसू लागले. या भीषण थरारामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली.
विमानाला बसणाऱ्या जोरदार धक्का आणि कंपनांमुळे केबिनच्या आतील छताचा काही भाग निसटून खाली आला. तसेच डोक्यावरील ओव्हरहेड सामान ठेवण्याचे कप्पे उघडून प्रवाशांचे सामान खाली पडू लागले. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे केबिनमध्ये एकच गोंधळ उडाला आणि प्रवासी भीतीने आरडाओरडा करत देवाचा धावा करू लागले. या थरारक घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
इराणच्या सेपेहरान एअरलाइन्सच्या बोइंग 737 विमानाचे टायर उड्डाणानंतर फुटले आणि इंजिनमध्येही बिघाड झाला. एअर टर्ब्युलन्समुळे केबिनचे छतही कोसळले. त्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. pic.twitter.com/Nl86MWXpQ0
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 16 सप्टेंबर 2026
वैमानिकाने अत्यंत प्रसंगावधान राखून विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घोषणा केली आणि तात्काळ मशहद विमानतळाकडे विमान वळवले. सुदैवाने, वैमानिकाच्या कौशल्यामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात यश आले. या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप असून कोणीही जखमी झाले नसल्याचे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सेपेहरान एअरलाइन्सच्या विमानासोबत मशहद विमानतळावर घडलेली ही अलिकडच्या काळातील दुसरी घटना असल्याने विमान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Comments are closed.