Asian Games: वरुण चक्रवर्ती आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर, विप्रज घेणार त्याची जागा
हिंदुस्थानच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेट संघात वरुण चक्रवर्तीच्या जागी युवा लेगस्पिन ऑलराउंडर विप्रज निगमला संधी मिळणार आहे. बरगडीजवळ स्नायू दुखावल्यामुळे (साइड स्ट्रेन) ज्येष्ठ फिरकीपटू वरुण या आशियाई स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
जपानमधील आयची-नागोया येथे १९ सप्टेंबरपासून आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत.
नाव न सांगण्याच्या अटीवर बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, ‘वरुण अनिश्चित काळासाठी बाहेर गेला आहे. यानंतर यादीत विप्रज निगम आणि कुलदीप यादव हे दोनच पर्याय उपलब्ध होते. कुलदीप या महिन्याच्या शेवटी वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार आहे’.
सध्या सुरू असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात दुखापत झाल्यानंतर वरुणला मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. या दुखापतीमुळे तो आता काही काळ मैदानापासून लांब राहण्याची शक्यता आहे.
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या २२ वर्षीय विप्रजने या लीगमध्ये आतापर्यंत १९ सामने खेळले असून त्यात १३ विकेट्स घेतल्या आहेत. तो एक उत्तम फलंदाज असून त्याने आपली क्षमताही सिद्ध केली असून, आयपीएल कारकिर्दीत त्याचा स्ट्राइक रेट सुमारे १७६ च्या आसपास राहिला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेट स्पर्धा २४ सप्टेंबरपासून सुरू होईल. हिंदुस्थानचा संघ थेट उपांत्यपूर्व (क्वार्टरफायनल) फेरीपासून खेळणार आहे.
वरुणचे बाहेर जाणे हिंदुस्थानसाठी मोठा धक्का आहे. पहिल्या टी२० सामन्यानंतर त्याला पुन्हा त्रास जाणवू लागला, ज्यामुळे पुढील तपासणीसाठी त्याला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये परत पाठवण्यात आले आहे.
Comments are closed.