डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रिंटिंग प्रेस मध्यरात्री कशी पाडली – हायकोर्टाचा संताप
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दादर येथील ऐतिहासिक प्रिंटिंग प्रेस मध्यरात्री कशी पाडली गेली? ही प्रेस पाडण्यासाठी तेथे 400 जणांचा जमाव जमला होता तेव्हा गुप्तचर यंत्रणा काय करत होती, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
ही घटना रोखण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरले. तरीदेखील प्रतिज्ञापत्र दाखल करून या अपयशाबद्दल पोलिसांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. कारवाई न करण्याचे समर्थन केले. पोलिसांची ही भूमिका धक्कादायक व वेदनादायक आहे. तेव्हा आता पोलीस आयुक्तांनीच या संपूर्ण घटनेचे सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेश न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठाने दिले.
महत्त्वाचे म्हणजे, ही प्रेस पाडण्यासाठी तेथे 400 ते 500 जणांचा जमाव जमला होता. तेव्हा गुप्तचर यंत्रणा काय करत होती. या जमावाची माहिती गुप्तचर यंत्रणेने पोलिसांना दिली होती का? पोलिसांनी ही घटना रोखण्यासाठी नेमके काय केले, याचाही खुलासा या प्रतिज्ञापत्रात करावा, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.
25 जून 2016 च्या मध्यरात्री ही प्रेस पाडली गेली. अशा प्रकारे मध्यरात्री महापालिका कारवाईला परवानगी देते का? या प्रेसचा ताबा घेण्यासाठी 400 ते 500 जणांच्या जमावाची मदत घेण्याची संमती देण्यात आली होती का, याची माहिती पालिका आयुक्तांनी प्रतिज्ञापत्रावर सादर करावी, असे न्यायालयाने बजावले आहे. यावरील पुढील सुनावणी 15 जूनला होणार आहे.
त्या पोलिसांची नावे द्या
ही घटना घडत असताना भोईवाडा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची नावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ही नावे सादर करण्यात आली नाहीत. त्यावेळी हजर असलेल्या पोलिसांनी या घटनेची माहिती देणाऱया आनंदराज आंबेडकरांनाच धमकावल्याचा आरोप आहे. तसेच याचा तपास योग्य प्रकारे झाला नसल्याचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची नावे सादर करा, असे कोर्टाने आयुक्तांना सांगितले आहे.
काय आहे प्रकरण…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930 मध्ये ही जागा विकत घेतली होती. दादर पूर्वेकडील गुप्ता गल्ली म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी ही जागा आहे. या जागेवर बाबासाहेबांनी ट्रस्ट स्थापन केले. येथे बुद्ध भूषण प्रिंटिंग प्रेस उभारण्यात आली. दरम्यान, यातील सदस्यांमधील वादामुळे येथील ही ऐतिहासिक प्रेस पाडण्यात आली. बाबासाहेबांचे हस्तलिखित व अन्य महत्त्वपूर्ण दस्तऐवजांचे यात नुकसान झाले. याप्रकरणी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Comments are closed.