पोक्सोच्या आरोपीला घर बांधण्यासाठी पॅरोल
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला उच्च न्यायालयाने पॅरोलची रजा मंजूर केली आहे. नवीन घर बांधण्यासाठी न्यायालयाने या आरोपीला सुट्टी दिली आहे.
या आरोपीला 14 वर्षांची शिक्षा झाली होती. या आरोपीच्या घराची जागा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ताब्यात घेण्यात आली. त्याचे घर तोडण्यात आले. त्याची आई एकटी आहे. मुलगा आजारी असतो. त्याला आता नवीन घर बांधायचे आहे. यासाठी पॅरोल मंजूर करावा, अशी विनंती त्याने कारागृह प्रशासनाकडे केली. कारागृह प्रशासनाने यास नकार दिला. या आरोपीने याचिका दाखल केली. न्या. उर्मिला जोशी-फाळके यांच्या एकलपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या आरोपीला याआधी पॅरोल मिळाला होता त्यावेळी त्याने सर्व नियमांचे पालन केले होते. आताही त्याला 25 दिवसांची रजा दिली जात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या आरोपीला पनवेल न्यायालयाने 14 वर्षांची शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयाने अपिलात ही शिक्षा कमी करून दहा वर्षांपर्यंत केली. या आरोपीच्या शिक्षेचा नऊ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तेव्हा त्याला पॅरोल दिला जात आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
Comments are closed.