‘तात्पुरती’ मान्यता अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नाही पालिकेकडून अर्ज नमुन्यांमध्ये सुधारणा
महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवसुरक्षा उपाययोजना अधिनियम, 2006 (सुधारणा 2026) अन्वये देण्यात येणारी ‘तात्पुरती अग्निसुरक्षा मान्यता’ ही इमारतीच्या आराखड्याच्या मंजुरीच्या टप्प्यावर देण्यात येणारी केवळ ‘शिफारस’ असून ती ‘अग्निसुरक्षा प्रमाणपत्र’ नसल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी आज स्पष्ट केले आहे. या निर्णयानुसार सुधारित संबंधित नमुन्यांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवीन किंवा सुधारित बांधकाम, वाढीव व बदल बांधकाम, दुरुस्ती प्रकरणे, अंतिम अग्निसुरक्षा मान्यतेसह तात्पुरत्या बांधकामासाठीचे सुधारित अर्ज नमुने तयार करण्यात आल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले.
‘तात्पुरती अग्निसुरक्षा’ मान्यता (Provisional Fire Safety Approval) ही इमारतीच्या आराखड्यास मंजुरी प्रदान करताना व प्रत्यक्ष बांधकामास प्रारंभ होण्यापूर्वी नियमांनुसार आवश्यक असलेल्या अग्निप्रतिबंधक व जीवसुरक्षा उपाययोजनांच्या पालनाबाबत देण्यात येणारी शिफारस आहे. मात्र ‘तात्पुरती अग्निसुरक्षा मान्यता’ ‘अग्निसुरक्षा प्रमाणपत्र’ (Fire Safety Certificate) म्हणून ग्राह्य धरली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ‘तात्पुरत्या’ अग्निसुरक्षा मान्यतेचे स्वरूप, उद्देश तसेच तिची कायदेशीर मर्यादा व व्याप्ती स्पष्ट होण्यासाठी संबंधित नमुन्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या अटी-शर्तींचे पालन बांधकाम करताना करावे लागणार आहे.
असे आहेत नवीन बदल
या सुधारित नमुन्यानुसार नवीन किंवा सुधारित बांधकामासाठी तात्पुरती अग्निसुरक्षा मान्यता, वाढीव व बदल बांधकामासाठी तात्पुरती अग्निसुरक्षा मान्यता, नवीन व सुधारित बांधकामातील दुरुस्तीसाठी तात्पुरती अग्निसुरक्षा मान्यता, अंतिम अग्निसुरक्षा मान्यता व तात्पुरत्या बांधकामासाठी तात्पुरती अग्निसुरक्षा मान्यता असे बदल करण्यात आले आहेत. याबाबतचे सुधारित अर्ज नमुने महानगरपालिकेच्या [https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous](https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous) या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
Comments are closed.