वर्ल्ड कप राऊंड अप – बॉस्टनची शेवटची शिट्टी!
बोस्टन: फ्रान्स-मोरोक्को सामना संपला आणि फक्त मोरोक्कोचा प्रवास थांबला नाही. बॉस्टनच्या वर्ल्ड कप अध्यायालाही पूर्णविराम मिळाला. चार आठवडे, सात सामने आणि असंख्य रंगीबेरंगी चाहत्यांनंतर शहराने स्पर्धेला निरोप दिला. स्टेडियमबाहेर फ्रेंच चाहत्यांचा आनंद होता, मोरोक्कन डोळ्यांत पाणी. पण एक भावना समान होती, ‘बॉस्टन, धन्यवाद!’.
लाल बोस्टन, निळा निकाल
बोस्टन: सामन्यापूर्वी डाऊनटाऊनवर मोरोक्कोच्या लाल झेंड्यांचे राज्य होते. ढोल, घोषणा, जर्सी आणि ‘अॅटलस लायन्स’चा आत्मविश्वास इतका भारी होता की, शहर अक्षरशः लाल झाले होते. पण मैदानावर निकाल निळ्या फ्रान्सच्या बाजूने झुकला. सामन्यानंतर दृश्य विलक्षण होते. लाल गर्दी शांत, निळी गर्दी विजयाच्या धुंदीत. एका रात्रीत बॉस्टनने फुटबॉलचा सर्वात जुना धडा शिकला की रस्त्यावरचा रंग आणि स्कोअरबोर्डचा रंग नेहमी एकच नसतो.
पॅरिस जागा, हॉर्न बेभान!
पॅरिस : अंतिम शिट्टी होताच पॅरिसच्या रस्त्यांवर फ्रेंच तिरंगी झेंडे दिसू लागले. गाड्यांचे हॉर्न, आनंदाच्या आरोळ्या आणि उपांत्य फेरीच्या स्वप्नांनी शहराची रात्र लांबली. महत्त्वाचे म्हणजे मोठ्या सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पॅरिसमधील जल्लोष तुलनेने शांत राहिल्याचे वृत्त आले. विजयाचा आवाज मोठा होता; गोंधळ मात्र अपेक्षेपेक्षा कमी.
पॅसाब्लांका निःशब्द
पॅसाब्लांका : ज्या कॅफेमध्ये सामन्यापूर्वी खुर्ची मिळणे कठीण होते, तिथे अंतिम शिट्टीनंतर आवाज खाली आला. मोरोक्कोच्या चाहत्यांना पराभवाची वेदना होती, पण अनेकांनी फ्रान्स त्या दिवशी श्रेष्ठ ठरल्याचे मान्य केले. हा फुटबॉल आहे, सबबी नाहीत, अशीच संघातूनही भावना उमटली. पराभव झाला, पण सलग दुसऱ्या विश्वचषकातील मोठी मजल अभिमानाची होती. डोळ्यांत अश्रू होते पण लाज नव्हती.
अन् फ्रान्स थांबला!
बोस्टन: 77 व्या मिनिटाच्या आसपास एमबाप्पे अस्वस्थ होऊन खाली पडताच फ्रेंच चाहत्यांच्या आनंदावर अचानक ब्रेक लागला. काही क्षणांसाठी स्कोअरबोर्डपेक्षा त्याच्या घोट्याकडे जास्त नजर गेली. वर्ल्ड कपमध्ये एका सुपरस्टारचे लंगडणेही राष्ट्रीय बातमी बनते. फ्रान्स जिंकला होता, पण बाहेर पडताना अनेकांच्या ओठांवर एकच प्रश्न होता की, किलियन ठीक आहे ना?
बोस्टोंचा 'लाल समुद्र' शून्यात
बोस्टन: सामन्यापूर्वी लाल जर्सींचा समुद्र असलेले बॉस्टन सामन्यानंतर हळूहळू रिकामे होत गेले. काही चाहते झेंडे खांद्यावर घेऊन शांत चालत होते, काही मोबाईलवर रिप्ले पाहत होते. पराभव मान्य करणे कठीण होते, कारण स्वप्न मोठे होते, पण फुटबॉलच्या यात्रेत निकाल बदलतो, पण चाहत्याचा झेंडा पुन्हा पुढच्या मोहिमेसाठी ठेवला जातो.
Comments are closed.