रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ने रचला इतिहास, ठरला मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ या 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे शिखर गाठत 100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. असा पराक्रम करणारा हा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलाच चित्रपट ठरला असून, यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत अभिमानाचे वातावरण आहे. यापूर्वी नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ हा सर्वाधिक गल्ला जमवणारा चित्रपट होता, मात्र आता ‘राजा शिवाजी’ने हा विक्रम मोडीत काढत पहिले स्थान पटकावले आहे.

कोईमोईनुसार, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचे कलेक्शन पाहता या चित्रपटाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचून आणले. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने 57.7 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 27.0 कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात 13.25 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही याची जादू कायम राहिली. 22व्या दिवशी 70 लाख, 23 व्या दिवशी 13.5 कोटी आणि 24 व्या दिवशी 1.4 कोटी रुपयांची कमाई करत या चित्रपटाने 24 दिवसांत एकूण 101.4 कोटी रुपयांचे निव्वळ (नेट) कलेक्शन गोळा केले. सुमारे 75 कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये तयार झालेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने केवळ हिंदुस्थानातच नव्हे, तर जगभरात चांगली कामगिरी केली आहे. या चित्रपटाचे एकूण ग्रॉस कलेक्शन 119.65 कोटी रुपये झाले असून, जगभरातील एकूण कमाई 124.55 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या गणितानुसार चित्रपटाने आपल्या मूळ गुंतवणुकीवर तब्बल 35% परतावा मिळवला असून, हा चित्रपट सध्या मोठ्या नफ्यात आहे. या ऐतिहासिक यशानंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 मराठी चित्रपटांच्या यादीत ‘राजा शिवाजी’ अग्रस्थानी आला असून, त्यापाठोपाठ सैराट, बाईपण भारी देवा, वेड आणि नटसम्राट यांसारख्या चित्रपटांचा क्रमांक लागतो.

या भव्य ऐतिहासिक चित्रपटात स्वतः रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांच्या सोबतीला जेनेलिया देशमुख, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. याशिवाय, बॉलिवूडचा सुलतान सलमान खान याने चित्रपटात साकारलेली छोटी पण प्रभावी भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. विशेष बाब म्हणजे, रितेश देशमुख यांचा 10 वर्षांचा मुलगा राहिल देशमुख यानेही या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

Comments are closed.