ब्राझिलने केली हैतीची ऐशी तैशी; विजयी बोहनीसह आशा पल्लवित, पराभवासह हैतीचे आव्हान संपुष्टात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मॅथ्यूस कुन्हाच्या दोन भन्नाट गोलांच्या जोरावर पाच वेळच्या जगज्जेत्या ब्राझिलने हैतीचा 3-0 गोल फरकाने धुव्वा उडवला. ब्राझिलसारख्या दिग्गज संघाचा यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमधील हा पहिला विजय ठरला. या पराभवासह हैतीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर ब्राझिलने बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या.

मोरोक्कोविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 1-1 अशी निराशाजनक बरोबरी झाल्यानंतर प्रशिक्षक कार्लो अँचेलोटी यांनी यावेळी मॅथ्यूस कुन्हाला सुरुवातीपासून संधी दिली आणि त्याने ती सार्थ ठरवली. या सामन्यात ब्राझिलने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. सामन्याच्या पहिल्या सत्रात विनिसियस ज्युनियरच्या प्रयत्नावर हैतीचा गोलरक्षक जोनी प्लासिदे याने बचाव केला. मात्र, परत आलेल्या चेंडूवर झडप घालत कुन्हाने विश्वचषकातील आपल्या कारकिर्दीतील पहिला गोल नोंदवला. त्यानंतर विनिसियसच्या अचूक पासवर कुन्हाने डाव्या पायाच्या जोरदार फटक्याने चेंडू जाळ्यात धाडत ब्राझिलची आघाडी 2-0 अशी वाढवली.

पहिल्या सतराच्या अखेरीस विनिसियस ज्युनियरने स्वतःही गोल करत ब्राझिलला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हैतीला पुनरागमनाची कोणतीही संधी मिळाली नाही. ब्राझिलचा आक्रमक खेळाडू राफिन्हाचा सुरुवातीचा गोल ऑफसाइडमुळे रद्द ठरला, तर दुखापतीमुळे त्याला पहिल्याच सत्रात मैदान सोडावे लागले. दुसरीकडे, स्टार खेळाडू नेयमार पोटरीच्या दुखापतीमुळे सलग दुसऱ्या सामन्यातही खेळू शकला नाही.

Comments are closed.