ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची आजपासून दिल्लीत बैठक होत आहे
दोन दिवस विविध जागतिक मुद्यांवर चर्चा होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत यावर्षी 14 आणि 15 मे रोजी होणाऱ्या 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे (2026) आयोजन करत आहे. या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अनेक देशांचे विदेशमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी भारतात दाखल झाले आहेत. या बैठकीला ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशिया या देशांचे विदेशमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच संयुक्त अरब अमिरातीचे उप विदेशमंत्री, तर चीनचे शेर्पा शिष्टमंडळ सहभागी होण्याची शक्यता आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर भूषवतील.
युरोप आणि पश्चिम आशिया या दोन्ही ठिकाणी युद्धे पेटलेली असताना, भारताने 14-15 मे रोजी ब्रिक्स विदेशमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला असाधारण भू-राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली. या बैठकीत ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळांचे प्रमुख सहभागी होतील, असे सांगण्यात आले. ब्रिक्स परिषदेदरम्यान हे पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतील. बैठकीदरम्यान, ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री समान हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. यावर्षी ब्रिक्सचे अध्यक्षपद भारत भूषवत आहे. नवी दिल्लीसाठी ही बैठक व्यासपीठ ठरत असून तिथे प्रमुख व्यक्ती ऊर्जा बाजारपेठा, व्यापारी मार्ग आणि जागतिक सत्ता संतुलनात बदल घडवून आणणाऱ्या संघर्षांवर चर्चा करतील.
ब्रिक्स ही एक प्रमुख आंतर-सरकारी संघटना असून त्यात ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया या 11 उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. ही संघटना आर्थिक सहकार्य, भू-राजकीय प्रभाव आणि जागतिक प्रशासकीय सुधारणांना प्रोत्साहन देते. सुरुवातीला 2006 मध्ये ब्रिक (ब्राझील, रशिया, भारत, चीन) म्हणून स्थापन झालेल्या या संघटनेत 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश होऊन ती ब्रिक्स बनली. त्यानंतर 2024-2025 मध्ये इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया यांचा समावेश करून तिचा विस्तार करण्यात आला.
Comments are closed.