जालना हादरलं! खूनांची मालिका थांबेना, जालन्यातील गोंदेगावात तरुणाचा निर्घृण खून
जिल्ह्यात खूनांची मालिका थांबण्याचं नाव घेत नसतानाच आज 27 एप्रिल रोजी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना तालुक्यातील गोंदेगाव येथे एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आज पहाटे गोंदेगाव येथील 33 के.व्ही. विद्युत उपकेंद्राच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एका तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. डोक्यावर दगडाने वार करून त्याची निर्दयी हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच मोठी गर्दी घटनास्थळी जमली.
मृत तरुणाची ओळख अंबड तालुक्यातील पानेगाव येथील रहिवासी असलेले मच्छीन्द्र कोंडीबा दराडे हे गोंदेगावचा पाहुना आहे. तो आपल्या मामीच्या अंत्यसंस्कारासाठी गोंदेगाव येथे आला होता. अंत्यसंस्कारानंतर तो नातेवाईकांकडे थांबला होता. मात्र रात्री अचानक बेपत्ता झाल्यानंतर आज सकाळी त्याचा मृतदेह सापडल्याने नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह पथकाने पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांच्या वतीने, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.
Comments are closed.