स्विफ्ट कारमधून आले अन् शाळेजवळून 4 विद्यार्थ्यांचे अपहरण केले; आरोपींना सिनेस्टाईल अटक


बुलढाणा : जिल्ह्यातील मलकापूर (Buldhana) शहरातून तीन शालेय विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचं सिनेस्टाईल अपहरण करण्यात आल्याच्या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, पोलीस (Police) आणि नागरिकांच्या सतर्कतेने अपहरणकर्त्यांची कार मोताळा शहराजवळ पकडली. त्यानंतर, या कारमधून चारही विद्यार्थ्यांची (Student) सुटका करण्यात आली आहे. मात्र, या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली होती. अपहरण करण्यात आलेल्या तीन विद्यार्थी आणि एका विद्यार्थीनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपहरणाच्या घटनेनं हे सर्व विद्यार्थी भयभीत झाल होते, त्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात समुपदेशन व उपचार सुरू आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात आज सकाळी एका अपहरण नाट्याने चांगलीच खळबळ उडाली. सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मलकापूर शहरातील गांधी चौक परिसरातून एक 14 वर्षीय विद्यार्थिनी व तीन शालेय विद्यार्थ्यांचे लाल रंगाच्या स्विफ्टकारमधून अपहरण करण्यात आले. कारमधून आलेल्या तीन अपहरणकर्त्यांनी कारमध्ये बळजबरीने बसवून त्यांचे अपहरण केले. मात्र, भल्या सकाळी झालेल्या या घटनेची माहिती तात्काळ परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ खबरदारी घेत बुलढाण्याच्या दिशेने निघालेल्या कारचा पाठलाग करत मोताळा येथे अपहरणकर्त्यांची कार अडवली.

नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांची तत्परता व पाठलागामुळे अपहरणकर्त्यांची कार अडवण्यात यश आले. या कारमधून अपहृत चारही विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. यावेळी नागरिकांनी अपहरणकर्त्यांना चांगला चोप दिला व कारची तोडफोडही केली. बोराखेदी पोलिसांनी या तिन्ही अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतलं असून हे अपहरणकर्ते कोण आहेत? त्यांनी ही कार कुठून आणली?आपहरणाचा उद्देश काय? याची चौकशी करण्यात येत आहे. सध्या ही बोराखेदी पोलीस स्थानकासमोर नागरिकांची मोठी गर्दी जमली असून पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करत आहे.

हेही वाचा

पुण्यातील NDA मध्ये शिकणाऱ्या माजी सैनिकाच्या मुलाचं टोकाचं पाऊल, वसतीगृहातील खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बेडशीटच्या साहाय्याने…

आणखी वाचा

Comments are closed.