महायुतीतील वाद चव्हाट्यावर, राष्ट्रवादीचा भाजप आमदाराला घेराव, नेमकं काय घडलं?

बुलधाना बातम्या: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भाजप आमदार चैनसुख संचेती यांना घेराव घालण्यात आला.  मलकापूर शहराच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नालेसफाई , घनकचरा व पाणी प्रश्नी आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मलकापूर नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी भाजप आमदार चैनसुख संचेती त्या ठिकाणी आल्याने अजित पवार गटाच्या नेत्यांनी त्यांना धारेवर धरले. यामुळे मलकापूरमध्ये महायुतीतच मतभेद असल्याचे पाहायला मिळाले.

मलकापूर शहरात नालेसफाई, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधांवरील दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मलकापूर नगर परिषदेवर घागर मोर्चा काढण्यात आला.

अजित पवार गटाकडून भाजप आमदाराला घेराव

शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नालेसफाई न झाल्यामुळे आरोग्यविषयक धोके वाढले आहेत. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. या मोर्चादरम्यान भाजपचे आमदार चैनसुख संचेती घटनास्थळी दाखल झाले असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून तीव्र शब्दांत जाब विचारला.

मलकापूरमध्ये महायुतीत मतभेद

सध्या मलकापूर नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे, ज्याचा परिणाम शहरातील समस्यांवर होतो आहे. या सगळ्या घडामोडींमुळे मलकापूरमध्ये महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील वाद चव्हाट्यावर आला असून, स्थानिक राजकारणात हा संघर्ष चर्चेचा विषय ठरत आहे.

अजित पवार गटाच्या नगर परिषदेकडे विविध मागण्या

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मलकापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटलंय की, मागील 12 ते 15 दिवसापासून होणाऱ्या दुषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. त्यामुळे डायरीया, मलेरीया सारख्या संसर्गजन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. मलकापूर शहरातील मान्सून पूर्व मोठ्या  नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या साफसफाई करण्यात याव्या, जेणेकरून पावसाचे पाणी रोडवर येणार नाही. मालमत्ता धारकाकडून शास्तीफीची दोन टक्के रक्कम सावकारी पध्दतीने करण्यात येते, ती त्वरित रद्द करण्यात यावी.मालमत्ता धारकांच्या मुल्यांकनामध्ये तफावती असून त्या दुरूस्त करण्यात याव्या. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत लाभार्थींना मिळणारे अनुदान तात्काळ देण्यात यावे. जनतेच्या मुलभुत हक्काच्या सुविधांकडे दुर्लक्ष होत असून मुलभूत गरजांची त्वरित दखल घ्यावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देण्यात आला आहे.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

आणखी वाचा

Ajit Pawar … नाहीतर तुमची जागा रोबोट घेईल, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा चिमटा

अधिक पाहा..

Comments are closed.