पुढच्या वर्षी भारतात बुलेट ट्रेन धावणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने व्हिडिओ जारी करत दिली पुष्टी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशाची पहिली बुलेट ट्रेन संचालित करण्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे. हायस्पीड रेल्वेमार्गापासून स्थानके, ब्रिज आणि बोगद्यांचे काम युद्धपातळीवर जारी आहे. बुलेट ट्रेन पूर्णपणे अनुकूल स्थिती 320 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावणार आहे. भारतात पुढील वर्षापासून बुलेट ट्रेन धावणार असल्याची पुष्टी रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तो वेगाने व्हायरल होतोय. ‘बुलेट ट्रेन पुढील वर्षी रुळांवर धावण्यासाठी सज्ज’ असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले आहे. तर व्हिडिओत बुलेट ट्रेनच्या ट्रॅकपासून स्थानकांपर्यंत जारी कामाची झलक दाखविण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेकडून बुलेट ट्रेन प्रकल्पात करण्यात येणाऱ्या कामांची झलक व्हिडिओत दिसून येते. सूरत-वापी मार्गावरील रेल्वे ब्रिज, स्थानक, बोगद्यांमध्ये काम करणारे रेल्वे कर्मचारी यात दिसून येतात. पुढील वर्षी बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्यासाठी युद्धस्तरावर काम पूर्ण केले जात असल्याचे यातून स्पष्ट होते.
भारताची पहिली बुलेट ट्रेन बहुधा 15 ऑगस्ट 2027 पासून धावताना दिसून येणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या पोस्टपूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याचे संकेत दिले होते. देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात 508 किलोमीटर लांब मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर होईल. याचा 348 किलोमीटरचा हिस्सा गुजरातमध्ये आहे. यापैकी वापी-सूरत सेक्शनचा व्हिडिओ रेल्वे मंत्रालयाने शेअर केला आहे, तो सुमारे 100 किलोमीटरचा आहे.
2 तासांत मुंबईहून अहमदाबाद
बुलेट ट्रेन 320 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावणार आहे, तर अहमदाबाद ते मुंबईदरम्यान सरासरी 300 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने बुलेट ट्रेन पुढील वर्षापासून धावू लागेल. सध्या उपलब्ध जलदगतीच्या रेल्वेंद्वारे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास सुमारे 6 तासांमध्ये पूर्ण होतो, तर बुलेट ट्रेनद्वारे हा प्रवास केवळ 2 तासांमध्ये पूर्ण होणार आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये रेल्वेकडून 12 थांबे निश्चित करण्यात आले आहेत. पहिले बुलेट ट्रेन स्थानक साबरमती असून अखेरचे मुंबईत आहे. याचबरोबर ठाणे, विरार, भोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद यांचा यात समावेश असेल.
Comments are closed.