IPL 2026 मध्ये जसप्रीत बुमराहची कामगिरी का खालावली? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकांनी सांगितलं 'हे' मोठं कारण

आयपीएल (IPL) 2026 मध्ये जिथे एकीकडे तरुण खेळाडू आपली चमक दाखवत आहेत, तिथे दुसरीकडे टीम इंडियाचा सर्वात भरवशाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) सुमार कामगिरी सर्वांना चकित करत आहे. ज्या बुमराहच्या चेंडूंनी भल्याभल्या फलंदाजांना घाम फोडला होता, त्यांच्या गोलंदाजीत आता ती धार दिसत नाहीये. या घसरणीचे नेमके कारण काय? याबाबत आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shashtri on jasprit Bumrah) यांनी मोठा खुलासा केला आहे.

या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना बुमराहने आतापर्यंत 10 सामन्यांत केवळ 3 विकेट्स घेतल्या आहेत. ही कामगिरी संघासाठी चिंतेची बाब ठरली असून, यामुळेच मुंबई इंडियन्सची गाडी या हंगामात रुळावरून घसरताना दिसत आहे.

बुमराहच्या या खराब फॉर्मबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, गेल्या 12 महिन्यांतील वर्कलोड (कामाचा ताण) त्याच्या कामगिरीवर परिणाम करत आहे. एका कॉमेंट्री शोमध्ये बोलताना शास्त्री म्हणाले, बुमराह सतत क्रिकेट खेळत आहे. यामध्ये भारताचा आशिया चषक आणि ICC T20 वर्ल्ड कपमधील ऐतिहासिक विजय यांचाही समावेश आहे. सततच्या खेळामुळे आलेला शारीरिक थकवा आणि मानसिक दडपण त्याच्या खेळावर परिणाम करत आहे. येणाऱ्या काळात भारतीय संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असून त्यात अनेक कसोटी मालिका आणि वनडे वर्ल्ड कपचा समावेश आहे. अशा परिस्थितीत बुमराहची फिटनेस आणि वर्कलोड योग्यरित्या हाताळणे अत्यंत गरजेचे असल्याचेही शास्त्रींनी स्पष्ट केले.

मुंबई इंडियन्सने नुकताच लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध विजय मिळवला असला तरी संघाची स्थिती अजूनही नाजूक आहे. 10 सामन्यांपैकी केवळ 3 विजय मिळवून मुंबईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईला जर प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकणे अनिवार्य आहे. त्यासोबतच त्यांना इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल, जे खूप कठीण दिसत आहे. थोडक्यात सांगायचे तर, मुंबईसाठी प्लेऑफची वाट आता जवळपास अशक्य वाटत आहे. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 10 मे रोजी रायपूरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध होणार आहे. हा सामना मुंबईसाठी ‘करा किंवा मरा’ (Do or Die) असा असणार आहे.

Comments are closed.