शेअर बाजारातील घसरणीचं प्रमुख कारण, विदेशी गुंतवणूकदारांचं कनेक्शन, दीड लाख कोटींची विक्री

शेअर बाजार अद्यतन मुंबई: भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घसरणीचं प्रमुख कारण विदेशी गुंतवणूकदारांकडून सुरु असलेली समभागांची विक्री होय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या यांच्या टॅरिफ वॉरमुळं जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. जागतिक बाजारातील तणाव वाढत असतानाच विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारातील त्यांच्या समभागांची विक्री सुरु करण्यात आली आहे. मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 30000 कोटी रुपयांची विक्री केली आहे. 2025 च्या पहिल्या अडीच महिन्यात विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 1 लाख 42 हजार कोटी रुपयांची विक्री केली आहे.

विदेशी गुंतवणूकदारांनी त्यांच्या समभागांची विक्री करण्याचा धडाका ऑक्टोबर  2024 पासून सुरु केला आहे. सर्वाधिक विक्री जानेवारी महिन्यात करण्यात आली. जानेवारी महन्यात 78027 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री करण्यात आली. तर, फेब्रुवारी महिन्यात 34574 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री करण्यात आली. मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजारातून 30015 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री करण्यात आल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय कारणं आणि देशांतर्गत कारणांमधून विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा धडाका सुरु आहे.

मॉर्निंगस्टार इन्वेस्टमेंटचे असोसिएटसचे संचालक प्रबंधक  हिमाशू श्रीवास्तव यांनी , “राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वात अमेरिकेच्या व्यापार धोरणांबाबत अनिश्चितता सुरु आहे. जागतिक स्तरावर त्यामुळं जोखीम घेण्याची क्षमता प्रभावित झाली आहे. त्यामुळं भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेबाबत विदेशी गुंतवणूकदार सतर्कता बाळगत आहेत.

विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री होण्याचं कारण म्हणजे अमेरिकेच्या यील्ड बॉण्ड आणि डॉलरची मजबुती हे आहे. अमेरिकेकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. त्याचवेळी भारतीय रुपयात घसरण सुरु आहे. यामुळं  विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री सुरु आहे.

जियोजीत फायनान्शिअल सर्व्हिसेसचे प्रमुख सल्लागार वी.के. विजयकुमार यांनी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढून चीनच्या शेअर बाजारात लावले जात असल्याचं म्हटलं. चीनच्या शेअर बाजाराची कामगिरी चांगली आहे. डॉलरच्या निर्देशांकात घसरण झाल्यानं अमेरिकेकडे जाणारा गुंतवणूकदारांचा ओढा मर्यादित होऊ शकतो. दरम्यान , अमेरिका आणि इतर देशांच्या मध्ये सुरु असलेलं व्यापार युद्ध, उत्पन्नातील अनिश्चितता या कारणामुळं सोने, डॉलर सारख्या सुरक्षित संपत्ती असलेल्या ठिकाणी गुंतवणूक केली जाण्याची शक्यता आहे.

विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय  शेअर बाजारात 2024 मध्ये 427 कोटी गुंतवले होते. 2023 मध्ये 1 लाख 71  हजार कोटी, 2022 मध्ये जगातील केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवल्यानं  1.21 लाख कोटींची विक्री केली होती.

इतर बातम्या :

IPO Update : संरक्षण क्षेत्रातील कंपनी 5000 कोटींचा आयपीओ आणणार, पैशांचं नियोजन करुन ठेवा, कमाईची मोठी संधी

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..

Comments are closed.