डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारतात सोन्याच्या दरात उसळी, सोनं 90 हजारांच्या उंबरठ्यावर

सोन्याचे दर: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले असून 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपला आहे. सोन्याच्या किमतीत तब्बल ₹2,430ची वाढ होऊन, सोमवारी राजधानी दिल्लीत 10 ग्रॅमसाठी ₹88,500 चा विक्रमी उच्चांक गाठला. यामागे जागतिक बाजारातील स्थिर वाढ आणि कमकुवत रुपया हे मुख्य कारण असल्याचे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने सांगितले आहे. सोन्याने जागतिक बाजारात असणारी विक्रमी पातळी ओलांडली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. परिणामी जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात तेजी दिसून येत आहे. याचाच परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही झालाय. (Gold Rate)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि ॲल्यूमिनियमच्या सर्व आयातींवर 25% कर आकारण्याची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात ही वाढ झाली. परिणामी ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी झाल्यानेही सोन्याच्या किमती वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

काय झाल्यात सोन्याचांदीच्या किमती?

भारतात २४ कॅरेट सोन्याची किंमत स्थानिक सराफा बाजारात ₹86,070 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचली. 99.5% शुद्धतेच्या सोन्याच्या किंमतीत ₹2,430 ची वाढ होऊन ₹88,100 प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला आहे.चांदीच्या किंमती ₹1,000 ने वाढून ₹97,500 प्रति किलोवर पोहोचल्या.शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत असल्याने सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

येत्या काळात सोन्याच्या किमती आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात येत असून,ING बँकेच्या अहवालानुसार, अमेरिका-चीन दरम्यानच्या व्यापारी तणावामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.तज्ञांच्या मते, आगामी काळात सोन्याचा दर $3,000 प्रति औंस गाठू शकतो.

डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ कराचा निर्णया काय?

एकीकडे युरोप आणि चीनच्या इशाऱ्यांना न जुमानता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी स्टील आणि ॲल्यूमिनियमच्या आयातीवर 25% कर लादत या दोन्ही धातूंच्या उत्पादानावर असणाऱ्या विशेष करसवलती रद्द केल्या.  या निर्णयामुळे गुंतवणूकदारांची ‘सेफ गुंतवणूक’ म्हणून सोने खरेदीसाठी लगबग सुरु आहे.मात्र, आता सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली असून सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्यात 2430 रुपयांनी वाढ झाली. मुंबईत जव्हेरी बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 85 हजार 665 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावला होता.

हेही वाचा:

Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारताच्या शेअर बाजाराला हादरे, गुंतवणूकदारांना धक्के सुरु,7.68 लाख कोटी बुडाले

अधिक पाहा..

Comments are closed.