कॅनडाचा गोल्डी ब्रारला मोठा दणका; ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत पहिल्या क्रमांकावर टाकत १.६३ कोटींचे बक्षीस जाहीर
मोस्ट वाँटेड गँगस्टर गोल्डी ब्रार याच्या भोवतीचा फास आता अधिकच आवळला गेला आहे. कॅनडाने गोल्डी ब्रारला देशातील २५ ‘मोस्ट वॉन्टेड’ फरारी गुन्हेगारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर टाकले असून, त्याच्या अटकेबाबत माहिती देणाऱ्याला २ लाख ५० हजार कॅनेडियन डॉलर्स (सुमारे १.६३ कोटी रुपये) बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.
कायदा व सुव्यवस्था यंत्रणांसोबत काम करणाऱ्या ‘बोलो प्रोग्राम’ (BOLO Program) या सार्वजनिक सुरक्षा उपक्रमाने गुरुवारी या बक्षिसाची घोषणा केली. गोल्डी ब्रारचे खरे नाव सतिंदरजीत सिंग असून, सप्टेंबर २०२३ मध्ये विनिपेग येथे झालेल्या ३९ वर्षीय सुखदूल सिंग गिल याच्या हत्येप्रकरणी तो पोलिसांना हवा आहे. कॅनडा किंवा अमेरिकेत कुठेही त्याच्या अटकेस मदत करणाऱ्या विश्वसनीय माहितीसाठी हे बक्षीस लागू असेल. पोलिसांनी नागरिकांना त्याच्याबद्दल कोणतीही माहिती असल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
२०२३ मधील हत्याकांडाचे प्रकरण
विनिपेग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर २०२३ रोजी हॅझेल्टन ड्राइव्ह येथील एका घरात सुखदूल सिंग गिल याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस (RCMP), मॅनिटोबा जस्टिस आणि इतर तपास यंत्रणांच्या मदतीने या हत्येचा तपास करण्यात आला. याप्रकरणी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी गोल्डी ब्रार आणि करणबीर सिंग यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले असून, दोघांवरही हत्येचा कट रचणे आणि ‘फर्स्ट-डिग्री मर्डर’चे आरोप ठेवण्यात आले आहेत. मात्र, अद्याप या दोन्ही आरोपींचा शोध घेण्यात किंवा त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
एफबीआयकडूनही (FBI) सुमारे ८.९ कोटींचे बक्षीस
अमेरिकेच्या तपास यंत्रणेनेही (FBI) २८ सप्टेंबर रोजी गोल्डी ब्रारचा समावेश आपल्या ‘टॉप १० मोस्ट वॉन्टेड’ फरारी गुन्हेगारांच्या यादीत केला होता. त्याला अटक करण्यासाठी माहिती देणाऱ्याला एफबीआयकडून १० लाख अमेरिकन डॉलर्स (सुमारे ८.९ कोटी रुपये) इतके बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ब्रार हा कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असून, अमेरिका आणि कॅनडामध्ये खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी आणि नियोजित हत्याकांडांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा एफबीआयचा आरोप आहे.
Comments are closed.