दम्याचा आजार बरा करतो; अघोरी पूजेसाठी सात लाख द्या! भोंदूबाबावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पैशांचा पाऊस पाडण्यासह दम्याचा आजार बरा करण्याचे आमिष दाखवून नाशिक येथील भोंदूबाबाने पनवेलच्या दाम्पत्याची सुमारे साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी अरुण पाटील या भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

पनवेलमध्ये राहणारी तक्रारदार महिला दम्याच्या आजाराने त्रस्त होती. २०२२मध्ये तिच्या पतीला नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील अरुण पाटील हा अघोरी पूजेच्या माध्यमातून आजार बरा करतो, अशी माहिती मिळाली. त्यानंतर या दाम्पत्याने त्याची भेट घेतली. कालभैरव पूजा करून आजार बरा करण्यासह पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष त्याने दाखविल्याचा आरोप आहे. पूजेसाठी त्याने ५० हजार रुपयांची मागणी केली आणि त्यापैकी २५ हजार रुपये आगाऊ घेतले.

पैशांचा पाऊस पडलाच नाही

काही दिवसांनी दोन अनोळखी व्यक्ती नाशिक येथे घेऊन गेल्या. तेथे महिलेच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला गोदावरी नदीकिनारी नेण्यात आले. यावेळी तिला पांढरे पारदर्शक वस्त्र परिधान करण्यास सांगून अघोरी पूजा केली. यानंतर महिलेची प्रकृती पुन्हा बिघडल्याने दाम्पत्याने अरुण पाटील याच्याशी संपर्क साधला. त्याने पुढील पूजेसाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. बोकडाचा बळी देऊन पुढील विधी केला जाईल, असे सांगून त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र पैशांचा पाऊस पडला नाही आणि आजारही बरा झाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दाम्पत्याने थेट पोलीस ठाणे गाठले व भोंदूबाबा अरुण पाटीलच्या विरोधात तक्रार केली.

Comments are closed.