नवलच! – द्वीप-सागर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> अरुण

उन्हाळा वाढत चाललाय. म्हणजे समुद्राच्या पाण्याची वाफ वेगाने होणार आणि या महिन्याच्या अखेरीस वळिवाच्या पावसाच्या सरींची बरसात होणार. ही सारी प्रक्रिया जगभरातल्या विविध समुद्रांमध्ये घडत असते. ते सारे महासागर असतात.

अशा समुद्रांमध्ये छोटी-मोठी बेटं असतात. त्यातलं हिंदी महासागरातलं आणि जगातलं सर्वात मोठं बेट म्हणजे ऑस्ट्रेलिया. हे एक द्वीप-खंड आहे. आजचा नवलाचा विषय आहे तो एखादा समुद्रच चारही बाजूच्या भूभागामुळे द्वीप-सागर झाला असेल तर? कॅस्पियन समुद्र तसाच आहे.

चहूबाजूंच्या देशांमध्ये अडकलेल्या कॅस्पियन समुद्राचा विस्तार प्रचंड आहे. त्याचं क्षेत्रफळ तब्बल 3 लाख 71 हजार चौरस किलोमीटर आहे! कॅस्पियन समुद्र युरोप आणि आशिया खंडांच्या सीमेवर असून त्याच्या सभोवती रशिया, इराण, अझबैझान, तुर्कमेनिस्तान आणि कझाखस्तान असे देश आहेत. कॅस्पियन समुद्राची वैशिष्टय़े अनेक. तो इतर सर्व सागरसपाटींपेक्षा 90 फूट खोलवर असून त्याला खारं सरोवर म्हणता येईल, परंतु प्रचंड जलसाठय़ामुळे, त्यात उसळणाऱया लाटांमुळे त्याला समुद्राचंच स्वरूप आलं आहे. या समुद्राचं पाणी 130 पेक्षा जास्त नद्यांनी अबाधित ठेवलंय. रशियाची जीवनदायिनी व्होल्गा नदी याच सागराला मिळते आणि त्याला 80 टक्के पाणी पुरवते! हा समुद्र उत्तरेच्या बाजूला उथळ असून दक्षिणेकडे 1000 मीटर खोल आहे. 2005 ते 2023 या काळात तो 31000 चौरस किलोमीटर आक्रसला आहे. त्यामुळे त्यातील खास ‘कॅस्पियन-सील’ माशांचं प्रमाण 95 टक्के घटलंय.

कॅस्पियन समुद्राच्या परिसरात नैसर्गिक तेल आणि वायुचा प्रचंड साठा व कॅव्हियर किंवा स्टर्जन माशांच्या अंडय़ांची विपुलता आहे. या समुद्राभोवती असलेल्या सर्व देशांची त्यावर सत्ता आहे, की ‘मेरिटाइम’ या आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार पाहायला हवं यावर मतभेद आहेत. त्याला विशाल सरोवर (लेक) म्हटलं तर सभोवतीच्या देशांचा हक्क पोचतो. पण ‘सी’ (समुद्र) म्हटलं तर ‘इंटरनॅशनल मेरिटाइम लॉ’ म्हणजे आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यानुसार जागतिक ‘व्यवहार’ करावे लागतील. भोवतीच्या देशांसाठी ‘कॅस्पियन सी’ला ‘सरोवर’ म्हणणं फायद्याचं, पण जागतिक सागरी मानांकनानुसार त्याचा विस्तार समुद्रासारखाच आहे. थोडक्यात निसर्गाने त्याला ‘लॅन्डलॉक’ केलं, पण मतभेदाच्या लाटा उसळतायत त्या मानवी जगात!

Comments are closed.