नेदरलँडच्या राजकन्यांच्या हत्येचा कट उधळला; नाझी विचारसरणीच्या आरोपीला अटक, कुऱ्हाड अन् ‘ब्लडबाथ’चा उल्लेख असलेली चिठ्ठी जप्त

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नेदरलँडच्या राजघराण्यावर चालून आलेले एक मोठे संकट टळले आहे. नेदरलँडची भावी राणी राजकन्या कॅथरिना अमालिया आणि तिची बहीण राजकन्या अ‍ॅलेक्सिया यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका 33 वर्षीय माथेफिरूला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडे कुऱ्हाडी आणि ब्लडबाथचा उल्लेख असलेली चिठ्ठी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर नेदरलँडच्या राजघराण्याच्या सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे.

नेदरलँडमधील हेग शहरातून फेब्रुवारी महिन्यात एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. हा व्यक्ती कट्टर उजव्या विचारसरणीचा असून त्याने नाझी विचारांनी प्रेरित होऊन राजकन्यांच्या हत्येचा कट रचला होता. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून त्या पार्श्वभूमीवर या कटाचा सविस्तर तपशील समोर आला आहे. तपासादरम्यान पोलिसांना आरोपीच्या ताब्यातून अत्यंत आक्षेपार्ह वस्तू मिळाल्या आहेत.

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून कुऱ्हाड जप्त केली आहे. या कुऱ्हाडीवर राजकन्या अ‍ॅलेक्सिया हिचे नाव, इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद आणि नाझी काळातील सीग हेल हे शब्द कोरलेले होते. आरोपीकडे एक हस्तलिखित चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीवर दोन्ही राजकन्यांची नावे आणि ब्लडबाथ असा शब्द लिहिलेला होता. ‘इंडिया टुडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

राजकन्या अमालिया (वय – 22) हिला गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने धमक्या मिळत आहेत. यापूर्वी ड्रग कार्टेलने तिला आणि माजी पंतप्रधानांना पळवून नेण्याची धमकी दिली होती. सततच्या धमक्यांमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव तिला तिचे ॲमस्टरडॅममधील विद्यार्थी जीवन सोडावे लागले आणि 2024 मध्ये काही काळ स्पेनच्या माद्रिद येथे गुप्तपणे राहावे लागले होते.

अमालिया साध्या मुलीसारखी घराबाहेर पडू शकत नाही. तिला सतत राजवाड्यात कडेकोट बंदोबस्तात राहावे लागते, असे राणी मॅक्सिमा यांनी सांगितले. तर मला एका सामान्य विद्यार्थ्यासारखं आयुष्य जगायचं आहे. रस्त्यावरून चालणं किंवा एखाद्या दुकानात जाणं, या साध्या गोष्टींसाठीही मी आसुसलेली आहे, असे राजकन्या अमालिया म्हणाली.

Comments are closed.