केंद्र सरकार आंदोलकांशी चर्चेसाठी तयार आहे.
केंद्रीय मंत्री पासवान यांनी केली विरोधकांवर टीका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नीट-युजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या संदर्भात आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पक्षाच्या प्रतिनिधींसह चर्चा करण्यास केंद्र सरकार सज्ज आहे. लवकरच चर्चेला प्रारंभ होऊ शकतो. आंदोलकांच्या सर्व शंका दूर करण्यास आम्ही सक्षम आहोत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्रीं चिराग पास्वान यांनी मंगळवारी येथे केले.
विरोधी पक्ष दीपके यांच्या आंदोलनावर आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या आंदोलनासंबंधी केंद्र सरकार ताठर भूमिका घेत आहे, हा विरोधकांचा आरोप धादांत खोटा आहे. केंद्र सरकारने चर्चेसाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत, हे सोमवारच्या चर्चेमुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विरोधकांनी आंदोलकांचा कैवार घेऊन अफवा पसरवू नयेत, असा इशारा चिराग पास्वान यांनी दिला आहे.
विरोधकांना समजावणे अशक्य
विरोधक सध्या काहीही समजून घेण्याच्या परिस्थितीत नाहीत, असे दिसून येते. विरोधकांना काही समजावणे म्हणजे म्हशीसमोर बासरी वाजविण्यासारखे आहे. विरोधकांना केवळ संसदेचे कामकाज बंद पाडणे, हा एकच मार्ग माहीत आहे. या अधिवेशनात संसदेसमोर अनेक महत्वाची विधेयके आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढविण्यासंबंधीच्या विधेयकाचा यात समावेश आहे. अशा स्थितीत विरोधकांनी संसदेचे कामकाज होऊ दिले पाहिजे. त्यांनीही त्यांची बाजू मांडण्याची संधी केवळ संसदेतच उपलब्ध होऊ शकते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
समिती स्थापन होण्याची शक्यता
आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. ही समिती आंदोलकांसमवेत चर्चेचा कार्यक्रम आणि वेळापत्रकही निर्धारित करेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या समितीत केंद्रीय मंत्री आणि सत्ताधारी आघाडीचे नेते यांचा समावेश असू शकतो. ही समिती कॉक्रोच जनता पक्षाच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करुन विश्वासाचे वातावरण निर्माण करेल. दीपके यांच्या संघटनेनेही चर्चा करण्यासाठी संमती दिली असल्याचे सूत्रांचे म्हणणे असले, तरी अद्याप या महितीला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
Comments are closed.