Mega Block – मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; लोकल फेऱ्या 15 मिनिटे उशिराने धावणार

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार, 28 जून 2026 रोजी रेल्वे रुळांची दुरुस्ती, पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षेच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाउन’ धीम्या मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 03:55 वाजेपर्यंत असेल. या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून गाड्या नेहमीपेक्षा उशिराने धावतील. त्यामुळे प्रवाशांनी ब्लॉक लक्षात घेऊनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई येथून सकाळी 10:14 ते दुपारी 03:32 या वेळेत सुटणाऱ्या ‘डाउन’ धीम्या मार्गावरील लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान ‘डाउन’ जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंड आणि माटुंगा स्थानकांवर त्या पुन्हा ‘डाउन’ धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि आपल्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. दुसऱ्या बाजूला, ठाणे येथून सकाळी 11:07 ते दुपारी 03:51 या वेळेत सुटणाऱ्या ‘अप’ धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुलुंड स्थानकावर ‘अप’ जलद मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांवर थांबतील. पुढे माटुंगा येथे या गाड्या पुन्हा ‘अप’ धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि आपल्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

या ब्लॉकच्या परिणामामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे सकाळी 11:00 ते सायंकाळी 05:00 या वेळेत येणाऱ्या किंवा तिथून सुटणाऱ्या सर्व ‘अप’ आणि ‘डाउन’ लोकल गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल ब्लॉक अत्यंत आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Comments are closed.