Ratnagiri News -खतटंचाईमुळे शेतकरी संकटात; तातडीने उपाययोजना करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार; महाविकास आघाडीचा इशारा

चिपळूण तालुक्यात निर्माण झालेल्या तीव्र खतटंचाईमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. युरिया, डीएपी, एनपीके यांसारख्या अत्यावश्यक खतांचा तुटवडा तसेच दुबार पेरणीसाठी आवश्यक बियाण्यांची अनुपलब्धता यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. खतटंचाईच्या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. शेतकऱ्यांना खते उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

चिपळूण तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये खतांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी खतांच्या कृत्रिम टंचाईमुळे काळाबाजार होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने तातडीने हस्तक्षेप करून तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात खतांचा साठा उपलब्ध करून द्यावा, दुबार पेरणीसाठी आवश्यक बियाण्यांची त्वरित व्यवस्था करावी. तसेच खत वितरण प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवून काळाबाजार रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही न केल्यास महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीव्र लोकआंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश आप्पा खेडेकर, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष दत्ता शेट पवार, तालुकाध्यक्ष राजेश केळसकर, तालुका कार्याध्यक्ष शिरीष काटकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा दीपिका कोतवडेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी, शिवसेना शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर देसाई, काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षा निर्मला जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष साजिद सरगुरो, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष मुन्ना जस्नाईक, युवासेना शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तालुकाध्यक्षा अरुता अडविलकर, शहराध्यक्षा रुक्सार अल्वी, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष रईस अल्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मनोहर खेडेकर, नगरसेविका नसरीन खडस, नगरसेविका वैशाली कदम, नगरसेविका मिस्बा, माजी नगरसेविका सीमा चाळके तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.