Nanded News – ऑपरेशन टायगर नव्हे, हे तर ऑपरेशन बाजार; रोहित पवार यांची टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सत्ताधार्‍यांच्या ऑपरेशन टायगरवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. हे ऑपरेशन टायगर नव्हे, हे तर ऑपरेशन बाजार असल्याचे ते म्हणाले. मतदारसंघाच्या पुनर्ररचनेसाठी केंद्र सरकार डिलेमीटेनशनचा मुद्दा पुढे आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधार्‍यांकडून साम,दाम, दंड, भेद याचा वापर करत खासदार फोडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नांदेड येथे आगामी शेतकर्‍यांच्या कर्जमुक्ती आंदोलनासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून अत्यंत घातक प्रवृत्तीने अशा प्रकारे खासदार फोडण्याचा प्रकार सुरु असून, सरकार डिलिमीटेनशनचा कायदा आणण्यासाठी ती खेळी खेळत आहे. अशा प्रकारे खासदार फोडणे हे लोकशाहीला घातक असल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीचे सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करुन शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. पंढरपूर येथे करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलना दरम्यान शेतकर्‍यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. अधिवेशन झाल्यानंतर मार्ग काढू, असे सरकारने सांगितले. मात्र कर्जमाफीच्या जाचक अटी दूर करुन सरसगट कर्जमाफी मिळवून घेण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करु, असेही ते म्हणाले.

येत्या २९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोठे आंदोलन करण्यात येणार असून, त्यानंतर विदर्भात हे आंदोलन करण्यात येईल, हे आंदोलन व्यापक असेल, असेही ते म्हणाले. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले होते. गतवर्षी सुमारे सात लाख २८ हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असताना अपेक्षित मदतीऐवजी शेतकर्‍यांच्या माथी तुटपुंजा निधी देण्यात आला. पिकविमा योजनेतही अनेक तालुक्यावर अन्याय झाला. २२०० मदत मिळण्याऐवजी पिकविम्याचे केवळ ८८६ रुपये शेतकर्‍यांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या काळात सरसकट कुठलीही अट न घालता वीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती. याचीही त्यांनी आठवण करुन दिली. सरसकट व विनाअट कर्जमाफी हा मुद्दा घेवून आपण लढत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकर्‍यांना सरसकट व विनाअट कर्जमाफी दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.

नीट परिक्षेतील गैरव्यवहार प्रकरणावरुनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. २०२४ मधील पेपरफुटी प्रकरणातील संबंधित अधिकार्‍याला बढती देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आगामी काळात मोठे आंदोलन उभारले जाईल. केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर, माजीमंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर हेही उपस्थित होते.

Comments are closed.