भाजपला सोपं जावं म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले, खैरेंचा आरोप

चंद्रकांत खैरे: महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (Mahanagar Palika Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली आहे. कुठं युत्या तर कुठं आघाड्या झाल्या आहेत. तर कही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकीट वाटपाच्या मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटात चांगलच वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)  यांनी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपला सोपं जावं म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापल्याची टीका खैरे यांनी केली आहे.

भाजप नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतही महिलांनी नाराजी व्यक्त केली

भाजप नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतही महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही महिलांना तिकीट न मिळाल्याने रडू कोसळल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी चंद्रकांत खैरे यांनाच जाब विचारला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी काही महिला इच्छुक होत्या. मात्र, त्यांना तिकीट मिळालं निसल्याने या महिलांनी चंद्रकांत खैरे यांना जाब विचारला. यावेली महिला रडत असल्याचंही पाहायला मिळालं.

अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी, चंद्रकांत खैरे आक्रमक

काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांनी नुकताच शिवसेना ठाकरे गटाच प्रवेश केला आहे. त्यानंतर  अंबादास दानवे यांनी रशीद मामू यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. यावरुन देखील चंद्रकांत खैरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मी मामुच्या प्रचाराला जाणार नाही. हे टीकोजीराव दानवे यांनी केले आहे. आज यादी सामनात पहिली. मला विचारलं नाही . हा माझा अपमान आहे.  अंबादास दानवे ठरवून करतो. मी पक्ष उभा केला पैसा खर्च केला असे खैरे म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू (Former mayor Rashid Khan) यांना उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर आला होता. यानिमित्ताने पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) विरुद्ध अंबादास दानवे असा सुप्त संघर्ष रंगला होता. अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने मुंबईतील शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) रशीद मामू (Rashid Mamu) यांचा शिवसेनेत प्रवेश झाला होता. त्यावेळी  भवन इमारतीच्या दारात चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामू यांना फटकारले होते. मी तुला उमेदवारी मिळून देणार नाही.  माझा तुला विरोध आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामूंना सगळ्यांदेखत सुनावले होते. यावेळी रशीद मामू यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, चंद्रकांत खैरे त्यांना बरेच काही बोलले होते. मात्र, आता याच चंद्रकांत खैरे यांच्या विरोधानंतरही अंबादास दानवे यांनी रशीद मामू यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. रशीद मामू यांना उमेदवारी दिल्यावर पाहा मी काय करतो, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला होता. त्यामुळे आता चंद्रकांत खैरे काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील या वादाचा फटका निवडणुकीत ठाकरे गटाला बसणार का, हेदेखील पाहावे लागेल.

आणखी वाचा

Comments are closed.