चंद्रपूर भाजपमध्ये पुन्हा वादाचा भडका, महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावरुन वादाचा भडका
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेत महापौरपद मिळवणाऱ्या भाजपमधील धुसफूस सुरुच आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या अचानक घेण्यात आलेल्या पदग्रहण सोहळ्यात पुन्हा एकदा मुनगंटीवार-जोरगेवार वादाचा भडका उडाला आहे. चंद्रपूर शहराचे स्थानिक आमदार असूनही किशोर जोरगेवार यांना पदग्रहणासाठी बोलवण्यात न आल्याचं म्हणत जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांनी पदग्रहण कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तर या प्रकरणात ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे.
भाजपमध्ये दोन गटात वादाचा भडका
आज दुपारी केंद्रीय अर्थसंकल्पावर आयोजित केलेली प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अचानक महापौर आणि उपमहापौर यांचा पदग्रहण सोहळा होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर तातडीने सर्व भाजप कार्यकर्ते आणि मुनगंटीवार समर्थक नगरसेवक महानगरपालिकेत दाखल झाले. अचानक होणाऱ्या या पदग्रहण सोहळ्याची कुणकुण लागतात जोरगेवार समर्थक नगरसेवक देखील महानगरपालिकेत दाखल झाले आणि त्यानंतर जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी जोरगेवारांना का बोलावलं नाही असा सवाल करत पदग्रहण कार्यक्रमावर बहिष्कार घातला. यामुळे मुनगंटीवार-जोरगेवार वादाचा पुन्हा एक नवीन अध्याय पाहायला मिळाला आहे.
महापौर आणि उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावर बहिष्कार घालणाऱ्या नगरसेवकांबद्दल सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले जे गेले त्यांना जाऊ द्या, ते भाजपवर टीका करणारे लोक आहेत. पक्ष त्यांची दखल घेईल, त्यांना निमंत्रण दिलं होतं, त्यांना काय करायचं ते करू द्या.
किशोर जोरगेवार यांना का बोलवण्यात आलं नाही याबाबत मुनगंटीवार म्हणाले की त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू द्या, बोलवलं नसेल तर मला माहित नाही. हा कार्यक्रम घाई घाई ने घेण्यात आला अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यात निमंत्रित न करण्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ज्याने कोणी हे केलं आहे त्याचा मी निषेध करतो आणि चंद्रपुरात मला न बोलवण्याची मुनगंटीवार यांनी आता ही परंपरा सुरू केली आहे आणि आज तर हद्दच झाली आहे, पक्षाच्या महापौराच्या पदग्रहणाचं मला निमंत्रण देखील देण्यात आला नाही, असं जोरगेवार म्हणाले.
संगीता खांडेकर यांच्या निवडीनंतर मी त्यांचा अभिनंदन केलं पण त्यांनी मला आज साधा फोन देखील केला नाही, याचं मला अतिशय दुःख आहे, असं आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. संगीता खांडेकर महापौर व्हाव्यात म्हणून मी जेवढे कष्ट घेतले असतील तेवढे कदाचित कुणी घेतले नसतील. अशा प्रकारची वागणूक आपल्या कार्यकर्त्यांना द्यायला सांगणं हे काही मोठेपणाचं लक्षण नाही, माणूस पदांनी नाही तर मनाने मोठा होतो, असंही जोरगेवार म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.