चंद्रपूर निवडणूक प्रमुखपदावरून किशोर जोरगेवारांची गच्छंती, सुधीर मुनगंटीवार नव्हे तर ‘या’ नेत्य

चंद्रपूर निवडणूक 2026: चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक (Chandrapur Municipal Election) तोंडावर असताना भाजपमधील (BJP) अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांना निवडणूक प्रमुखपदावरून हटवण्यात आले असून, त्यांच्या जागी माजी राज्यसभा खासदार अजय संचेती (Ajay Sancheti) यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय भाजप प्रदेश नेतृत्वाने घेतल्याची माहिती समोर येत आहे.

किशोर जोरगेवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यात सुरू असलेल्या दीर्घकालीन पक्षांतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. मुनगंटीवार यांची नाराजी कमी करण्यासाठीच जोरगेवार यांच्या ऐवजी अजय संचेती यांची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Kishor Jorgewar vs Sudhir Mungantiwar: किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुख म्हणून झाली होती नियुक्ती

यापूर्वी प्रदेश भाजपच्या निर्देशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेसाठी आमदार किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर भाजपचे शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांना इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार इच्छुक उमेदवारांना किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र याच दरम्यान, सुधीर मुनगंटीवार गटाचे माजी शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी इच्छुक उमेदवारांनी थेट मुनगंटीवार यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले. या आवाहनामुळे पक्षात नव्या वादाला तोंड फुटले.

Kishor Jorgewar vs Sudhir Mungantiwar: किशोर जोरगेवार यांची गच्छंती

राहुल पावडे यांच्या या भूमिकेला भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी तीव्र आक्षेप घेतला असून, पावडे यांच्यावर पक्षीय कारवाईचे संकेत दिले आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणावर राहुल पावडे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता.  तर आता निवडणूक प्रमुख पदावरून आमदार किशोर जोरगेवार यांची गच्छंती केल्याची माहिती समोर येत आहे. जोरगेवार यांच्या जागी आता माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मुनगंटीवार यांची नाराजी कमी करण्यासाठी जोरगेवार यांच्या ऐवजी संचेती यांची निवड करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Kishor Jorgewar: किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया

या प्रकरणावर किशोर जोरगेवार यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, अशा प्रकारची कुठलीही माहिती माझ्यापर्यंत नाही. अजय संचेती हे निरीक्षक आहेत. असं काही करण्याचे कारण नाही. निवडणूक प्रमुख हा इथला स्थानिक नेता असतो. निरीक्षक आणि प्रभारी हे बाहेरचे असतात. मुनगंटीवार यांची नाराजी चंद्रपूरकरिता नव्हती. त्यांची नाराजी राज्यातील विषयांवर होती. ते मोठे नेते आहेत, त्यांची ताकद कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु, माझ्यापर्यंत अशी कुठलीही माहिती आलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

Devendra Fadnavis Sudhir Mungantiwar Meet: आधी माझी शक्ती कमी केली म्हणत पक्ष नेतृत्वावर टीका; सुधीर मुनगंटीवार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचताच काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.