माणुसकीच्या चिंधड्या उडवल्या, सावकाराने गरीब शेतकऱ्याला कर्जफेडीसाठी किडनी विकायला लावली, चंद्र
कर्ज फेडण्यासाठी चंद्रपूरच्या शेतकऱ्याने विकली किडनी एकीकडे देशात आणि राज्यात राज्यकर्त्यांकडून विकसित भारत आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्नं दाखवली जात असतानाच स्वातंत्र्यापासूनच उपेक्षित राहिलेल्या विदर्भातील चंद्रपूर (Chandrapur news) जिल्ह्यात आजही गरिबीमुळे होणारी शेतकऱ्यांची (Farmers) होरपळ किती विदारक असू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण समोर आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एका सावकाराने (Moneylender) आपले कर्जाचे पैसे वसूल (Loan repayment) करण्यासाठी शेतकऱ्याला अक्षरश: स्वत:ला विकायला लावले आहे.
कर्जाचा परतावा करण्यासाठी सावकारांनी शेतकऱ्याला किडनी (Kidney) विकायला लावल्याचा धक्कादायक आरोप चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने केला आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर येथे राहणाऱ्या रोशन कुडे या शेतकऱ्याने हा आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी रोशन याने दुधाचा व्यवसाय (Milk business) सुरू करण्यासाठी एक लाख रुपये व्याजाने खाजगी सावकाराकडून घेतले होते. मात्र, दुर्दैवाने त्याची जनावरे मेली आणि तो सावकारचे कर्ज फेडू शकला नाही. तेव्हापासून या खाजगी सावकाराने वारंवार पैसे देण्याचा तगादा लावला.
दिवसेंदिवस पैसे थकत गेल्याने मुद्दलाची रक्कम आणि व्याजाच्या रकमेत (Loan Interest) मोठी वाढ झाली. अखेर त्या सावकाराने पैसे फेडण्यासाठी शेतकऱ्याला त्याची किडनी विकण्याचा सल्ला दिला आणि त्या सावकाराच्या सल्ल्यानेच रोशन कुठे या शेतकऱ्याने आधी कोलकाता (Kolkata) आणि नंतर तिथून कंबोडिया (Kambodia news) येथे जाऊन 8 लाख रुपयांना स्वत:ची किडनी विकली. सावकारामुळेच माझ्यावर ही वेळ आल्याचा आरोप करत पीडित शेतकऱ्याने सावकारावर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे राज्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या गमजा मारल्या जात असतानाच ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे प्रश्न किती भीषण आहेत आणि त्यांची अवस्था किती दयनीय आहे, हे या घटनेमुळे पुन्हा एकदा दिसून आले आहे. आता यावर राज्य सरकार आणि कृषीमंत्री किती तत्परतेने कारवाई करणार आणि संबंधित सावकाराला काय शिक्षा देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.