हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला घेता?

चंद्रपूर : राज्याचं लक्ष लागलेल्या चंद्रपूर (Chandrapur) महापालिकेत काँग्रेसच्या धरसोड वृत्तीमुळे अखेर भाजपचा महापौर विराजमान झाला. ठाकरेंच्या शिवसेनेनं येथे काँग्रेसऐवजी भाजपला साथ देत भाजपचा महापौर केला, तर शिवसेनेला उपमहापौरपदाची संधी मिळाली. त्यावरुन, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा घोडेबाजार चंद्रपूर महापालिकेत झाल्याचे म्हटले. तसेच, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांचा (sudhir mungantiwar) बंगला तब्बल 1000 कोटींचा असल्याचेही त्यांनी म्हटले होते. आता, सुधीर मुनगंटीवार यांनी सपकाळांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

माझं घर महाग असेल तर त्यांनी कार्यालयासाठी विकत घ्यावं, त्यांनी जो आकडा सांगितला, त्यातल्या किती टक्क्यात घ्यायचं आहे ते सांगावं, असे म्हणत घर विकत घेण्याची ऑफरच सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. खरंतर काँग्रेसला असेच प्रदेशाध्यक्ष लाभले पाहिजे जे बेताल बोलतात, माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे की तुम्ही कितीला घर विकत घेता, तेवढाच मला फायदा होईल, असेही मुनगंटीवार यांनी म्हटलं. दरम्यान, चंद्रपुरात नक्कीच मोठा घोडेबाजार झाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा 1000 कोटीचा बंगला हा चर्चेचा विषय आहे. महापौर बनवण्याकरता त्यांनी तेवढेच पत्ते विकत घेतलेले आहेत. यात मोठा घोडेबाजार झालेला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं.

चंद्रपुरात भाजपचा महापौर

चंद्रपुरात अवघ्या एका मताच्या फरकाने भाजपच्या संगीता खांडेकर यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ईश्वर चिठ्ठीद्वारे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव विजयी झाले. त्यामुळे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यावरुन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरेंना थेट निर्वाणीचा इशारा दिला. तर, भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

चंद्रपुरात भाजप जोगरेवार यांच्यात पुन्हा वाद?

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या अचानक घेण्यात आलेल्या पदग्रहण सोहळ्यात पुन्हा एकदा मुनगंटीवार-जोरगेवार वादाचा भडका उडाल्याचे दिसून आले. चंद्रपूर शहराचे स्थानिक आमदार असूनही किशोर जोरगेवार यांना पदग्रहणासाठी बोलवण्यात न आल्याचे सांगत जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांनी पदग्रहण कार्यक्रमावर बहिष्कार  केला. प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अचानक महापौर आणि उपमहापौर यांचा पदग्रहण सोहळा होणार असल्याची केली घोषणा. त्यानंतर तातडीने सर्व भाजप कार्यकर्ते आणि मुनगंटीवार समर्थक नगरसेवक महानगरपालिकेत दाखल झाले. अचानक होणाऱ्या या पदग्रहण सोहळ्याची कुणकुण लागतात जोरगेवार समर्थक नगरसेवक देखील महानगरपालिकेत दाखल झाले. त्यानंतर जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी जोरगेवारांना का बोलावलं नाही? असा सवाल करत पदग्रहण कार्यक्रमावर बहिष्कार घातला. त्यामुळे, मुनगंटीवार-जोरगेवार वादाचा पुन्हा एक नवीन अध्याय सुरू झाल्याची चर्चा स्थानिक राजकारणात रंगली आहे.

हेही वाचा

अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा

आणखी वाचा

Comments are closed.