Chandrapur News – 300 रुपये द्या आणि मोबाईलवर बिनधास्त कॉपी करा, चंद्रपूरमध्ये परीक्षेचा खेळखंडोबा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरातून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही दृश्ये पाहून राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एकीकडे सरकार आणि प्रशासन ‘कॉपीमुक्त’ परीक्षेचे दावे करत असताना, दुसरीकडे मुल येथील सर्वोदय कॉलेजने कॉपीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. विशेष म्हणजे, हे विद्यार्थी कोणत्याही साध्या परीक्षेला बसलेले नसून, ते बी.ए. प्रशासकीय सेवा (Civil Services) या विषयाचा पेपर देत आहेत. उद्याचे अधिकारी घडवणाऱ्या या परीक्षेचा पायाच भ्रष्टाचारावर आधारलेला असल्याचे दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल फोन आहेत आणि ते कोणतीही भीती न बाळगता गुगलवर उत्तरे शोधून पेपर सोडवत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या परीक्षा केंद्रावरील सोयीसुविधांचाही बोजवारा उडाला आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक) अंतर्गत येणाऱ्या या महाविद्यालयात सुमारे ४०० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मात्र, एका बाकावर तीन-तीन विद्यार्थ्यांना बसवण्यात आले असून, जागा अपुरी असल्याने अनेक विद्यार्थी चक्क जमिनीवर बसून पेपर लिहीत आहेत. इतकेच नाही तर येथे साध्या शौचालयाचीही सोय नाही. हा सर्व प्रकार कॉलेज प्रशासनाच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा आरोप होत आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याकडून ३०० रुपये घेऊन त्यांना मोबाईलवरून कॉपी करण्याची परवानगी दिली जात असल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि जे स्वबळावर परीक्षा देऊ इच्छित होते, त्यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत केंद्राबाहेर धाव घेतली.

Comments are closed.