जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी होऊ नये, आर्थिक सहाय्य कोण करत आहे? चंद्रपूर कॉक्रोच जनता पार्टीच्या सदस्यांना पोलिसांची नोटीस
कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीसाठी 10 ऑक्टोबर रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे हे आंदोलन होणार आहे. यापार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांनी चंद्रपुरातील सीजेपीच्या दोन स्वयंसेवकांना नोटीस धाडली आहे. या नोटीसीमध्ये आंदोलनात सहभागी होण्यामागील उद्देश काय, तसेच आंदोलनासाठी आर्थिक सहकार्य कोण करत आहे, याबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण मागितले आहे. त्याचबरोबर आंदोलनात सहभागी न होण्याच्या आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नोटीसीनुसार, जंतरमंतर येथील आंदोलनात चंद्रपुरातील सदस्य सहभागी होणार असल्याची माहिती मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित व्यक्तिकडून आंदोलनात सहभागी होण्यामागील उद्देश स्पष्ट करण्यास सांगितले आहे. तसेच आंदोलनासाठी कोणाकडून आर्थिक सहकार्य मिळत आहे, याबाबतही माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील आंदोलनात सहभागी होऊ नये, विनापरवानगी कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये, तसेच हिंसक कृत्यांना किंवा चिथावणीखोर भाषणांना प्रोत्साहन देऊ नये, अशा स्पष्ट सूचना नोटीसीत देण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या किंवा हिंसाचारास प्रवृत्त करणाऱ्या पोस्ट करू नयेत, असेही पोलिसांनी बजावले आहे. पोलिसांनी दिलेल्या कायदेशीर सूचनांचे पालन करावे आणि सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 37 अंतर्गत निर्बंध लागू असल्याचेही नोटीसीत नमूद आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास परिस्थितीनुसार प्रतिबंधात्मक अथवा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Comments are closed.