देवरुखजवळ बिबट्याची दहशत सुरूच; साडवली-सह्याद्री नगरमध्ये आज पहाटेच दर्शन
देवरुख शहराला लागूनच असलेल्या साडवली – सह्याद्री नगर परिसरात आज पहाटे एका बिबट्याने मोकळा वावर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक नागरिक श्री. भाई शिंदे यांच्या घरासमोर हा बिबट्या अतिशय आरामात फिरताना थेट सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.
गेल्या काही दिवसांपासून देवरुख शहर आणि लगतच्या ग्रामीण भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी अन्नाच्या शोधात बिबटे थेट मानवी वस्तीत घुसत असल्याने नागरिकांच्या, लहान मुलांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार वाढल्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी साडवली व देवरुख परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
Comments are closed.