चंद्रपुरात नदीत बुडून दोघांचा मृत्यू; भंडाऱ्यात दुचाकीच्या अपघातात मुलगा ठार, वडिल गंभीर

चंद्रपूर : राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने तुफान हजेरी लावल्याने नद्या-नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. काही नद्यांना पूर आल्याचंही दिसून येते. त्यामुळे, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना आवाहन केलं जातय. मात्र, पावसाळी पर्यटन किंवा नद्यांच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेताना तरुणांकडून अति धाडस केले जात आहे. चंद्रपूरमध्ये (Chandrapur) 10 वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना असंच अतिधाडस अंगलट आलं. नदीपात्रात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा नदीत (River) बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील टेकरी येथे ही घटना घडली. यवतमाळमध्येही मुसळधार पावसामुळे 17 गावांचा संपर्क तुटला आहे.

टेकरी येथील दहावीत शिकणारे 13 जण फुटबॉल मॅच झाल्यावर उमा नदीत पोहायला गेले होते. मात्र, नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यातील बुडाले दोन जण नदीत बुडल्याची घटना समोर आली असून आयुष गोपाले (16) आणि जीत वाकळे (17) अशी मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. दोन्ही मृतक सिंदेवाही शहरातील रहिवासी असून घटनेची माहिती प्राप्त होताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, मृतकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेने वाकडे आणि गोपाले कुटुंबासह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे, घटनेचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

भंडाऱ्यात दुचाकीचा अपघात, मुलगा ठार, वडिल गंभीर

नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराकरिता जाणाऱ्या बापलेकाच्या दुचाकीला भरधाव ट्रॅक्टरनं भीषण धडक दिली. या अपघातात मुलाचा घटनास्थळीचं मृत्यू झाला तर, वडील गंभीर जखमी झाले. ही घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली इथं घडली. शंकर बावनकुळे (२९) असं मृतकाचं नावं आहे. तर, मुखरान बावनकुळे (६०) असं गंभीर जखमी वडिलांचं नावं आहे. लाखांदूर तालुक्यातील इटान येथील बापलेक हे भेंडाळा या गावाकडे निघाले असताना हा अपघात घडला. लाखांदूर पोलिसांनी ट्रॅक्टरसह चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

उमरखेड तालुक्यात मुसळधार पाऊस; 17 गावांचे मार्ग बंद

यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात संततधार पाऊस असल्याने पैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. उमरखेड तालुक्यात नदी काठावर असलेल्या चातारी, दराटी, गांजेगाव, सावळेश्वर, करंजी, माणकेश्वर, जेवली, या गावांतील काही घरात  पाणी शिरुन अनेक घरांचे नुकसान झाले आहे. नदी नाल्यांना पूर आल्याने परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हळद, कापूस, सोयाबीन यांसारख्या पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील छोट्या-मोठ्या नाल्यांना पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे, 17 गावांचा संपर्क तुटला असून बससेवा देखील विस्कळीत झाली आहे.

पैनगंगा पुलावरून वाहते, महामार्ग बंद

हिंगोली जिल्ह्यांमध्ये कालपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतोय त्याचबरोबर पैनगंगा नदी पात्रात आणि ईसापूर धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक आली आहे. येथील धरणाचे अनेक दरवाजे उघडून पाहण्याचा विसर्ग पैनगंगा नदीपात्रात आला आहे. त्यामुळे ईसापुर धरणातून सोडलेले पाणी कळमनुरी-पुसद या महामार्गावर असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावरून वाहत आहे. त्यामुळे, हा महामार्ग बंद झाला असून मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटलेला आहे. दरम्यान, पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला लांब लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, प्रवासी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पुराच्या दोन्ही बाजूला अडकून पडले आहेत.

हेही वाचा

नांदेडमध्ये पाऊस जोरदार, पाण्यात अडकली थार; भींत कोसळून ग्रामपंचायत सदस्यासह 2 ठार

आणखी वाचा

Comments are closed.