भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा ‘प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचा फोन, लोणावळ्यात आश्वासन


पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदारांना आमिष दाखवत नेतेमंडळींकडून मतदान देण्याचं, आमच्याच उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं जात आहे. यंदाच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा चलती पाहायला मिळत असून लाडक्या बहि‍णींना योजना बंद होईल, असे म्हणतही काहींनी अप्रचार सुरू केला आहे. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर मी अर्थमंत्री आहे, तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहे. तुम्ही मत द्या मी निधी देतो असे म्हणत मतदारांना भुरळ घातल्याचं दिसून आलं. आता, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही लोणावळातील कार्यकर्त्यांना, मतदारांना प्रश्न सोडविण्याचं आमिष दाखवलं आहे.

नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारात राज्यातील मंत्री आणि अनेक दिग्गज नेत्यांकडून वेगवेगळी प्रलोभनं दाखवली जात आहेत. काहीजण तर अप्रत्यक्षपणे धमकीही देत आहेत. त्यातचं आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भर पडल्याचं दिसून आलं. लोणावळ्यातील प्रलंबित प्रॉपर्टी कार्ड आणि सिटी सर्व्हेचा प्रश्न सोडवण्यासाठी मी 2 डिसेंबरनंतर म्हणजे मतदानानंतरच्या मंगळवारी बैठक घेतो अन् तुमचा प्रश्न तीन महिन्यात निकाली लावतो. मात्र, त्यासाठी भाजपा उमेदवारांना निवडून द्या, असेही त्यांनी म्हटले.

तुमचा प्रश्न मार्गी लावतो, भाजप उमेदवारांना निवडून द्या – बावनकुळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महसूलमंत्री म्हणून मला अधिकार दिला आहे. फक्त तुम्ही लोणावळ्यात भाजपचे उमेदवार निवडून द्या. मग मी माझ्या अधिकाराचा वापर करुन तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड आणि सिटी सर्व्हे करुन देईन, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. भाजप नेते तथा आमदार प्रवीण दरेकर आज लोणावळा नगरपरिषदेच्या प्रचारासाठी येथे आले होते.त्यावेळी लोणावळ्यातील प्रॉपर्टी कार्ड आणि सिटी सर्व्हेचा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने स्थानिक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकरांपुढे प्रश्न मांडला. त्यानंतर, दरेकरांनी थेट महसूलमंत्री बावनकुळे यांना फोन लावला. तसेच, तो फोन लाऊडस्पीकरवर ठेवून कार्यकर्त्यांसाठी संवाद साधला. त्यावेळी, बावनकुळे यांनी लोणावळ्याच्या जनतेला प्रलोभन दिल्याचं दिसून आलं. आता, महसूलमंत्री आणि दरेकर यांच्यातील संवादाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी निवडणूक प्रचारात लक्ष्मीदर्शन होईल, असे म्हटल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 30 तारखेला प्रचार संपणार आहे, त्यानंतर लक्ष्मीदर्शन होईल, असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा

मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.