देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याआधी आरशात पाहा, 100 कोटी वसुली प्रकरण जनता विसरलेली नाही; बावनकु

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : राज्यातील कलंकित मंत्र्यांविरोधात ठाकरे गटाने आज राज्यभरात आंदोलन केले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “मुख्यमंत्री फडणवीसांकडून अशी अपेक्षा होती की, ते भाजपची पारंपरिक शिस्त आणि भूमिका पुढे नेतील. पूर्वी पुराव्यानिशी आरोप झाले की, कोणत्याही चौकशीच्या आधी संबंधित मंत्र्यांची हकालपट्टी केली जायची. मात्र आता मुख्यमंत्री म्हणतात की, ‘आम्ही त्यांना समज दिली’. ही नेमकी कोणती समज?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “मग पुढच्या वेळी रमी नव्हे तर तीन पत्ती खेळा, बार सावलीत नव्हे तर उन्हात बांधा, बॅग उघडी नव्हे तर बंद ठेवा – असा हा विनोदी प्रकार सुरु आहे का? हे सगळं योग्य वाटत नाही.” पाशवी बहुमत, दिल्लीतील बापजादे आणि तरीही भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरत असतील, तर त्यांच्यावर नक्की कोणाचा दबाव आहे?, असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. आता यावरुन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय.

चंद्रशेखर बावनकुळे एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, उद्धव ठाकरे जी, खंडणीखोरांचं सरदार कोण आहे? हे जनतेला माहिती आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत कोण ‘चिफ मिनिस्टर‘ आहे? आणि कोण ‘ थिफ मिनिस्टर‘ हे देखील महाराष्ट्रातील जनतेनं दाखवून दिलं आहे. वाझे काय लादेन आहे का? असे म्हणत उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटी वसुली सुरू होती हे जनता विसरली नाही. त्यामुळे आदरणीय देवेंद्रजींवर टीका करताना जरा आपला भूतकाळ आठवा आणि विचार करून बोला.

इंडीया आघाडीत तुमची शेवटच्या रांगेतील किंमत महाराष्ट्रानं पाहिली

बाकी इंडीया आघाडीत तुमची शेवटच्या रांगेतील किंमत महाराष्ट्रानं बघितली. आजही आपल्याला शेवटच्या रांगेत उभं राहावं लागेल म्हणून तुम्ही दिल्लीतील आंदोलनात गेला नाहीत आणि इथं चार टाळके घेऊन आंदोलन केलं. तिकडं राहुल गांधींचं आंदोलन सुरू असताना आपली वेगळी चूल मांडून तुम्ही लक्ष वेधण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

उद्धव ठाकरेंना लोकं कंटाळले

उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना लोकशाहीचा आणि नैतिकतेचा गळा घोटला होता. आज देवेंद्रजींसारख्या प्रामाणिक नेतृत्वावर बोट ठेवण्याआधी तुम्ही स्वतःला आरशात पाहायला हवं. देवेंद्रजी फडणवीस यांचं काम हे फक्त भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचं नाही, तर स्थिर, विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचं आहे. महाराष्ट्रातील जनतेचा देवेंद्रजींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला लोकं कंटाळले आहेत, असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

आणखी वाचा

Uddhav Thackeray: मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते, जर तुमच्यात थोडाही स्वाभिमान, अभिमान शिल्लक असेल तर…

आणखी वाचा

Comments are closed.