CUET परीक्षेतही अनागोंदी उघड झाली
तांत्रिक अडचणींमुळे दोन तास विलंब : विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रावर आंदोलन
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नीट परीक्षेतील पेपरफुटीनंतर आता कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रेजुएट (सीयूईटी-यूजी) परीक्षेतही सावळा गोंधळ निर्माण झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. शनिवार, 30 मे रोजी पहिल्या सत्रातील पेपरला तांत्रिक बिघाडामुळे दोन तास विलंब झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. परीक्षा सकाळी 9 वाजता सुरू होणार होती, परंतु नंतर ती सकाळी 11 वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
देशभरातील अनेक परीक्षा केंद्रांवरील सर्व्हर आणि सिस्टीममधील समस्यांमुळे परीक्षा वेळेवर सुरू होऊ शकली नाही. अनेक केंद्रांवर विद्यार्थ्यांना तासन्तास थांबावे लागले, तर काही केंद्रांवर चार तास थांबल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, परीक्षा केंद्राबाहेर थांबलेल्या पालकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली.
‘सीयूईटी-यूजी’ ही नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) आयोजित एक संगणक-आधारित परीक्षा आहे. एनटीएच्या म्हणण्यानुसार, टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) मुळे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा उशिरा सुरू झाली. मात्र, तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला. कोणाचेही नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पुरेसा वेळ दिल्याचेही एनटीएने स्पष्ट केले.
दुसऱ्या शिफ्टच्या वेळेत बदल
याव्यतिरिक्त, ‘एनटीए’ने शनिवारच्या दुसऱ्या शिफ्टच्या वेळेत बदल जाहीर केले होते. ही शिफ्ट मूलत: दुपारी 3 वाजता सुरू होणार होती आणि रिपोर्टिंगची वेळ दुपारी 1 वाजता होती. तथापि, नंतर परीक्षा दुपारी 4 वाजता सुरू होईल आणि रिपोर्टिंगची वेळ दुपारी 2:30 वाजता असेल असे जाहीर केल्याने परीक्षार्थींचा गोंधळ उडाला.
‘सीयूईटी-यूजी’ 2026 परीक्षा 11 मे रोजी सुरू झाली असून ती 31 मे पर्यंत चालणार आहे. ‘एनटीए’नुसार, एकूण 15,68,866 उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. ही परीक्षा 21 दिवसांच्या कालावधीत 35 शिफ्टमध्ये घेतली जात आहे.
Comments are closed.